Pune : कंटेनरचे चाक डोक्यावरून गेल्याने तरुणी जागीच ठार; चाकण परिसरातील भीषण अपघात
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2023 08:36 PM2023-08-10T20:36:39+5:302023-08-10T20:40:02+5:30
चाकण झित्राईमळा हद्दीतील शाळेसमोर गुरुवारी (दि. १०) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला....
चाकण (पुणे) : तरुणीला दुचाकीवर पाठीमागे बसवून आंबेठाण बाजूकडून चाकण बाजूकडे निघालेल्या एकाच्या दुचाकीला पाठीमागून आलेल्या कंटेनरची धडक बसली. यावेळी झालेल्या अपघातात दुचाकीवर पाठीमागे बसलेल्या तरुणीच्या डोक्यावरून कंटेनरचे चाक गेल्याने तरुणी जागीच ठार झाली. चाकण झित्राईमळा हद्दीतील शाळेसमोर गुरुवारी (दि. १०) सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला.
सानिका अनिल कोकाटे (वय १९, रा. बिरदवडी, ता. खेड) असे या अपघातात ठार झालेल्या तरुणीचे नाव आहे. बाळू नामदेव मातेले (वय ४५, रा. बिरदवडी, ता. खेड) यांनी याप्रकरणी चाकण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. कंटेनरचालक श्याम प्रकाश पाल (वय २३, रा. रामपूर, जि. मिझापूर) याच्यावर विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून सानिका ही गुरुवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास बाळू मातेले यांच्या दुचाकीवर (क्र. एमएच १४ केई ९७४४) पाठीमागे बसवून आंबेठाण बाजूकडून चाकणच्या दिशेने जात होती. त्याचवेळी त्यांच्या पाठीमागून भरधाव आलेल्या कंटेनरची (क्र. एमएच १२ एचडी ०२९७) मातेले यांच्या दुचाकीस पाठीमागून जोराची धडक बसली.
यावेळी मातेले व सानिका हे दोघे खाली पडले असता कंटेनरच्या पुढील चाकाखाली आलेल्या सानिकाचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. दरम्यान, चाकण परिसरात मागील दोन दिवसांत घडलेल्या अवजड वाहनांच्या धडकेत दोन जीवघेण्या घटना घडल्याने नागरिकांमध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. यामुळे चाकण आंबेठाण रस्त्यावरील अवजड वाहतुकीचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.