लोहगावात युवकाचा बुडून मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 08:14 PM2018-03-16T20:14:36+5:302018-03-16T20:14:36+5:30
लोहगाव हरणतळ्यात मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा लोहगाव येथे बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली.
विमाननगर : मासे पकडण्यासाठी गेलेल्या युवकाचा लोहगाव येथे बुडून मृत्यू झाल्याची घटना गुरुवारी रात्री घडली. या घटनेत छुट्टू उर्णव (वय ३०, मूळ रा.झारखंड सध्या रा. हरणतळेवस्ती, लोहगाव) याचा मृत्यू झाला. विमानतळ पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
पोलीस निरीक्षक विलास सोंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, छुट्टू हा लोहगाव हरणतळेवस्ती येथे वीटभट्टीवर काम करत होता. गुरुवारी दुपारी तो मित्रांसोबत हरणतळ्यात मासे पकडण्यासाठी गेला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो परत न आल्यामुळे त्याचे मित्र व नातेवाईकांनी त्याचा शोध घेण्यास सुरुवात केली.
शुक्रवारी सकाळी हरण तळ्याजवळ त्याचा शर्ट सापडला. घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक विजय जाधव व कर्मचारी यांनी जाऊन पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी अग्निशमन दलाच्या मदतीने हरणतळ्यात छुट्टूचा शोध घेण्यास सुरुवात केली. गळ टाकून व नंतर बोटीने त्याचा शोध सुरू होता. अखेरीस जवांनानी थेट तळ्यात उतरुन दुपारी साडे बाराच्या सुमारास छुट्टूचा मृतदेह बाहेर काढण्यात आला. मुख्य अग्निशमन दलाचे स्टेशन अधिकारी विजय भिलारे,फायरमन मनिष बोंबले,महेंद्र सकपाळ,दिगंबर बांदिवडेकर,जवान तानाजी मांजरे,सुधीर नवले,विजय पिंजण,अरुण गायकर, वाहनचालक करीम पठाण यांनी हरण तळ्यातील बुडालेल्या छुट्टूचा मृतदेह बाहेर काढला.शवविच्छेदनासाठी मृतदेह ससून रूग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील तपास विमानतळ पोलीस करीत आहेत.