पेण : राष्ट्रीय महामार्गावरून रात्री-अपरात्री अवजड वाहनांतून अवैध रेती वाहतूक सुरू आहे. प्रसारमाध्यमांनी याबाबत झोड उठविल्यानंतर अखेर महसूल यंत्रणेला जाग येऊन, पेण प्रांताधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी निधी चौधरी व पेण तहसीलदार वंदना मकू यांनी मंगळवारी रात्री ८.०० ते १२.०० व बुधवार पहाटे ६.०० ते १०.०० या वेळेत केलेला अवैध रेती वाहतुकीच्या १७ वाहनचालकांवर दंडात्मक कारवाई केली. या वेळी ९ वाहनचालकांकडून केलेली ९१ हजार ७६८ रुपयांची दंडवसुली शासकीय तिजोरीत जमा केली आहे. उर्वरित कारवाईची प्रक्रिया सुरू आहे.मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६६ वर (जुना नं. १७), आंबेत, महाड, रोहा येथून निम्मे रॉयल्टी असलेले, तर निम्मे अवैध रेती वाहतूक करणारे वाहनचालक व रेती माफियांचा व्यवसाय राजरोसपणे सुरू होता. अवजड मालवाहतुकीवर क्षमतेपेक्षा जास्त वजन नेण्यास कायद्याने बंदी असूनदेखील ही वाहतूक गेले कित्येक दिवस सुरू होती. रायगडच्या प्रसार माध्यमांनी या विरोधात झोड उठविल्यानंतर, रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाकडून याबाबतचे धडक कारवाईचे आदेश प्राप्त झाले. त्यानुसार, पेण प्रांत तथा सहायक जिल्हाधिकारी निधी चौधरी, तर पेण तहसीलदार वंदना मकू यांना याबाबत धडक मोहिमेचे आदेश दिले. मंगळवार रात्री राष्ट्रीय महामार्गावर मंडळ अधिकारी पेण, कासू, वाशी व हमरापूर या चार मंडळ अधिकारी व त्यांच्या क्षेत्रातील सजाचे तलाठी व इतर महसूल कर्मचारी अशी या धडक कारवाईत महसूल यंत्रणेची मोठी फौज तैनात झाल्याने पेण प्रांत कार्यालयीन आवारात १५ वाहने, तर पांडापूर-कासू येथील महामार्गालगत २ वाहने अशा एकूण १७ वाहनांवर ट्रकमध्ये रॉयल्टी व्यतिरिक्त असणाऱ्या अवैध रेतीवर प्रतीब्रासच्या पाचपट अशी दंडआकारणी करण्यात आली आहे. हमरापूर मंडळ अधिकारी यांनी वाहनचालकांकडून ६९ हजार २८५ रुपये दंडवसुली, तर वाशी मंडळ अधिकाऱ्यांनी २ वाहनांकडून २२,५५३ रुपये दंडवसुली अशा प्रकारे एकूण ९ वाहनचालकांवरील व कारवाईची दंडात्मक रक्कम ९१ हजार ७६८ रुपये वसूल करण्यात आली आहे. पेण मंडळ व कासू मंडळ अधिकारी वर्गाची करवाई सुरू असून, त्याबाबतचा अहवाल कारवाई सुरू असल्याने उपलब्ध झाला नाही. (वार्ताहर)
पेणमध्ये रेतीचे १७ ट्रक जप्त
By admin | Published: February 11, 2016 2:43 AM