जयंत धुळप
रायगड - रविवारी शिवजयंतीच्या दिवशी राज्यभर ढोल-ताशाच्या गजरात मिरवणुका आणि जल्लोष सुरु असताना तब्बल ४५ अंध युवक-युवतींनी रायगड पायी चढण्यास प्रारंभ करुन,वाटेतील प्रत्येक पायरी, दगड, माती,बुरुज, देवडय़ा यांना स्पर्श करीत अभेद्य आणि हिंदवी स्वराज्याची राजधानी राहिलेल्या शिवरायांच्या देदिप्यमान इतिहासाचा साक्षीदार असलेल्या रायगड किल्ल्यास अनूभवून आपल्या थेट ह्रदयात साठवून अनन्य साधारण अशी अनुभूती घेतली.
पुण्यामधील वेद वासुदेव प्रतिष्ठानच्या वासुदेव सेवा संघाचे अध्यक्ष अजितदादा कृष्ण तुकदेव यांच्या संकल्पनेतून व प्रयत्नाने स्वरगंधार सांस्कृतिक मंचाच्या स्वयंसेवकांच्या सहाय्याने या तब्बल ४५ अंध युवक-युवतींनी शिवजयंतीनिमित्त शिवराजधानी रायगडावर रोपवेने न जाता, पायी चालत चढून सर करण्याचा संकल्प केला आणि तो प्रत्यक्षात उतरवून आपल्या स्पर्शज्ञानाने रायगडचा चित्तथरारक इतिहास अनुभवला.
स्वयंसेवकांची कौतुकास्पद कामगीरीअमीत शुक्र , वैभव भोगले, आनंद सुराना, विश्वंभर साबळे, अनिल पितळे, अमिर मुल्ला, वैभव रानवडे, वैभव देसाई, नितीश जाधव, सुहास महाकाळे, सौरभ अत्ने, अपूर्वा तांबोळी, शिवानी स्वामी, गीता काळे या वेद वासुदेव प्रतिष्ठान आणि स्वरगंधार सांस्कृतिक मंचाच्या स्वयंसेवकांनी पुणे येथील अंध तरुण-तरुणींच्या वस्तीगृहातील या ४५ अंध तरूण तरूणींना शिवजयंतीच्या दिवशी हिंदवी स्वराज्याची राजधानी रायगड किल्ल्याची पायी यात्रा घडविण्याची जबाबदारी घेतली. या अंध तरूणांना व तरूणींना रायगड किल्ल्यावरील वेगवेगळ्या ऐतिहासिक स्थळांना भेटी देण्यासाठी नेऊन त्या प्रत्येक स्थळांचा इतिहास कथन करून तेथील वास्तुला हाताने स्पर्श करून अनुभवण्याचा भारावणारा आनंद घेण्याची अपूर्व संधी या स्वयंसेवकांनी दिली.
या अंध युवक-युवतींना गडारोहणादरम्यान कोणत्याहीं प्रकारचा त्रस होवू नये याकरिता या स्वयंसेवकांनी सर्व ती काळजी घेवून जय्यत तयारी केली होती. या अंध युवक-युवतींना शिवकाळात घेऊन जाण्याच्या मोहिमेसाठी ग्रुप डायरेक्टर प्रविण पाखरे यांनी विशेष मार्गदर्शन केले. परतीच्या प्रवासामध्ये पोलादपूरमार्गे प्रतापगड दर्शन घेऊन हे 45 अंध युवक-युवतींनी पुन्हा पुण्याला रवाना होण्यापूर्वी दुपारच्या भोजनासाठी लोहारे येथील बालाजी हॉटेल येथे आले असता त्यांच्या या थरारक कामिगरीने भारावलेले रायगड जिल्हा भारतीय जनता पार्टी युवामोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष श्रीकांत भिलारे आणि बालाजी हॉटेलचे मालक जयेश लिंबाचिया यांनी या सर्वांना मोफत भोजन देवून त्यांच्या आंनदात आगळा सहभाग दिला.