कळंबोलीमधील एमटीएनएलच्या पडीक इमारतींना आले खंडराचे स्वरूप
By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2019 11:24 PM2019-09-07T23:24:16+5:302019-09-07T23:24:26+5:30
परिसरातील रहिवाशांना त्रास; साप, विंचवांचा वाढला उपद्रव
अरुणकुमार मेहत्रे
कळंबोली : कळंबोली वसाहतीत सेक्टर - १० येथील महानगर टेलिफोन निगमच्या इमारती मागील १२ वर्षांपासून ओस पडल्या आहेत. वापर नसल्याने या इमारती खंडर बनल्या आहेत. झाडे व झुडपे वाढली आहेत, त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांचा वावर वाढला आहे. विशेष म्हणजे, मागील अनेक वर्षांपासून या इमारती दुर्लक्षित राहिल्याने त्याचा ताबा गर्दुल्ले आणि गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी घेतला आहे. यासंदर्भात स्थानिक रहिवाशांच्या अनेक तक्रारी असूनही संबंधित विभागाकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही.
सिडकोने सुरुवातीला कळंबोली वसाहत विकसित केली. त्यामध्ये विविध नियोजनाच्या माध्यमातून नागरिकांना स्वस्तात घरे देण्यात आली. त्याचबरोबर गृहनिर्माण संस्थांनाही आरक्षित भूखंड देण्यात आले. त्यावर रो-हाउसेस व छोटेखणी बंगले उभारले. हे करीत असताना आवश्यक पायाभूत सुविधांची पूर्तता मात्र त्या प्रमाणात झाली नाही. चाकरमान्यांसह विविध खासगी व शासकीय प्राधिकरणातील नोकरदारांनी मोर्चा कळंबोलीकडे वळविला. सेक्टर -१० मध्ये एमटीएनएलच्या एकूण सहा इमारती आहेत.
या सहा इमारतीत एमटीएनएलच्या कर्मचाऱ्यांसाठी ९६ सदनिका आहेत. या सदनिका मागील अनेक वर्र्षांपासून वापराविना पडून आहेत. पायाभूत सुविधांची कमतरता असल्याने येथील अनेक कर्मचारी स्वत:च्या घरात स्थलांतरित झाले आहेत. या इमारतींची पडझड सुरू झाली आहे. २००५ मध्ये आलेल्या महापुराचा मोठा फटका या इमारतींना बसला. सध्या या इमारती धोकादायक बनल्या आहेत. इमारतीच्या आवारात मोठ्या प्रमाणात गवत वाढले आहे.
साप व इतर सरपटणाºया प्राण्यांचा वावर वाढल्याने परिसरातील इमारतीत राहणाºया रहिवाशांना याचा ताप झाला आहे. या निर्मनुष्य इमारतींचा ताबा गर्दुल्ले आणि असामाजिक घटकांनी घेतल्याचा रहिवाशांचा आरोप आहे. या पार्श्वभूमीवर रासपचे जिल्हाध्यक्ष विकास वाक्षे यांनी यासंदर्भात आक्रमक भूमिका घेतली असून तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे.
गर्दुल्ल्यांचा वावर वाढला
इमारतीत कोणीही राहत नसल्यामुळे येथे गर्दुल्ल्यांचा वावर वाढला आहे, तसेच रात्रीच्या वेळी रहिवाशांना यांचा त्रास होत आहे. मोडकळीस आलेल्या सोसायटीस संरक्षण भिंत आहे. गेटही कायमस्वरूपी बंद करण्यात आले आहे; परंतु इमारतीच्या बाजूला असलेली संरक्षण भिंत तोडण्यात आली आहे. तेथूनच या इमारतीत प्रवेश केला जातो. याचबरोबर इमारतीभोवती मोठ्या प्रमाणात झाडे असल्यामुळे रात्रीच्या वेळी काळोख असतो. तसेच काही प्रमाणात या परिसरातील रोडवरील पथदिवे बंद असल्याचे येथील रहिवाशांचे म्हणणे आहे.