नितीन भावे खोपोली : खोपोली रेल्वे स्टेशनजवळच्या वस्तीत एक वयस्कर महिला भरकटलेल्या अवस्थेत मंगळवारी सायंकाळी सापडली. तिच्या डोळ्यांना मोतीबिंदूमुळे स्पष्ट दिसत नव्हते, त्याच सोबत ती स्वत:ची संपूर्ण माहिती देऊ शकत नव्हती. सामाजिक कार्यकर्ते सुरेश वाघमारे यांनी तिची विचारपूस करून तिला खोपोलीच्या ठाणे अंमलदार विजय सूळ यांच्याकडे नेले. यानंतर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्थेच्या माध्यमातून सोशल मीडियावर माहिती देवून या वृध्द महिलेचे घर शोधून तिला नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आले.पोलीस उपनिरीक्षक श्रीरंग किसवे यांनी त्या महिलेचा पत्ता शोधण्यासाठी अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेच्या गुरु नाथ साठेलकर, शेखर जांभळे आणि विजय भोसले यांना पाचारण केले. त्या वृद्ध महिलेला विश्वासात घेऊन मिळालेल्या माहितीच्या आधारावर घाटकोपर - मुंबई येथील पत्ता व तिचे नाव सुमित्रा गणपत दिवेकर एवढे संदर्भ पुढे आले. मिळालेल्या अर्धवट माहितीवरून घाटकोपरसारख्या ठिकाणी शोध घेणे कठीण काम होते. सोशल मीडियाच्या माध्यमातून ठिकठिकाणी ही बाब प्रसारित केली गेली. अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी संस्था आणि सहजसेवा फाउंडेशनचे अनेक सदस्य त्याचप्रमाणे घाटकोपर पोलीस ठाण्यातील यंत्रणा शोध मोहिमेवर काम करू लागली. शेवटी साधारणपणे सहा तासांच्या अथक प्रयत्नानंतर आजीबार्इंच्या घरचा पत्ता शोधण्यात यश आले. लागलीच दोन्ही पोलीस ठाण्याच्या समन्वयातून तिच्या नातलगांशी संपर्क झाला आणि उशिरा रात्री त्यांना नातेवाइकांच्या ताब्यात दिले. खोपोली पोलीस ठाण्याचे निरीक्षक राजन जगताप आणि त्या आजीबार्इंचे नातेवाईक यांनी मदतीसाठी आलेल्या सर्वांचे आभार मानले.
आजीबार्इंना भेटली घरची माणसं, सोशल मीडियाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 1:04 AM