नवदुर्गांच्या मूर्तींचे रंगकाम वेगात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 04:14 AM2018-10-02T04:14:03+5:302018-10-02T04:14:34+5:30
तालुक्यातील कार्यशाळांमध्ये नवरात्रोत्सवाचे काउंटडाउन सुरू झाले आहे. अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाची चाहूल पेण नगरीतील मूर्ती कार्यशाळांमध्ये
दत्ता म्हात्रे
पेण : तालुक्यातील कार्यशाळांमध्ये नवरात्रोत्सवाचे काउंटडाउन सुरू झाले आहे. अवघ्या दहा दिवसांवर येऊन ठेपलेल्या नवरात्रोत्सवाची चाहूल पेण नगरीतील मूर्ती कार्यशाळांमध्ये दिसू लागली. विविध कार्यशाळांमध्ये नवदुर्गेच्या ५०० पेक्षा जास्त मूर्ती रंगवून तयार आहेत. सार्वजनिक मंडळांच्या मागणीनुसार या मूर्ती सजवण्यात येत आहेत.
बुधवार, १० ते गुरुवार, १८ आॅक्टोबरपर्यंत नवरात्रीच्या नऊ रंगांचे भक्तिरंग, जागर, भजन, कीर्तन, प्रवचन, विधीयुक्त होम हवन असा शारदीय नवरात्रोत्सव सार्वजनिक मंडपातील गरबा, दांडिया, इव्हेंट साजरे होतील. मात्र, यासाठी लागणाऱ्या नवदुर्गेच्या मूर्तीची मागणी पेणच्या मूर्ती कार्यशाळांमध्ये होत असते. नवरात्रोत्सवाचे आता स्वरूप बदलले आहे. गावोगावी देवदेवतांच्या मंदिरात साजरा होणारा हा उत्सव आता देवीच्या मोठ्या मूर्तींची स्थापना करून, सेलिब्रिटींना आमंत्रित करून इव्हेंट स्वरुपात साजरा होऊ लागला आहे. नवरात्रोत्सव हा शक्तिपीठांचा उत्सव असल्याने युवा-युवती बरोबरीने कुटुंबातील प्रत्येक सदस्य मनमोकळेपणाने यामध्ये नऊ दिवस सहभागी होतो. मग तो उपक्रम धार्मिक कुळाचाराचा असो व मनोरंजनाचा. नवदुर्गाचे प्रत्येक रूप सध्या पेणच्या कार्यशाळेत पहायला मिळते.
अंबिकामाता, सरस्वती माता, महिषासुरमर्दिनी, चंडिका, अष्टभुजा, महालक्ष्मी अशा देवींच्या विविध रूपातील मूर्तींना कार्यशाळांमधून मागणी असते. त्या अनुषंगाने कार्यशाळांमध्ये देवीच्या मूर्तींना पॉलिश, व्हाईटनेस, रंगकाम, कलाकुसर, शाईकाम व डोळ्यांची आखणी याबरोबरने कलात्मक अशा ज्वेलरी, हिरे, मोती या इटिमेशनचा पूर्ण वापर करीत तब्बल ५००० पेक्षा अधिक मूर्ती रंगवून तयार असल्याचे कार्यशाळांतील सूत्रांनी माहिती दिली.
सध्या पितृपक्ष पंधरवडा सुरू असल्याने कामगार वर्ग मोठ्या प्रमाणात उपलब्ध असून, येत्या नऊ दिवसांत कार्यशाळांमध्ये मोठ्या नवदुर्गेच्या मूर्तींवर रंगकाम पूर्ण करण्याबाबत लगबग सुरू असल्याचे चित्र दिसत आहे.