कोथुर्डे धरणगळती बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 02:45 AM2018-05-18T02:45:49+5:302018-05-18T02:45:49+5:30
महाड तालुक्यातील कोथुर्डे धरणावर गेली तीन वर्षे गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांना यश आले असून, गळती बंद झाल्याने आता २२ गावांचा पाणीप्रश्न या वर्षी सुटला आहे. १८ लाख रुपये खर्च करून ही गळती बंद करण्यात आली आहे.
- सिकंदर अनवारे
दासगाव : महाड तालुक्यातील कोथुर्डे धरणावर गेली तीन वर्षे गळती रोखण्यासाठी पाटबंधारे विभागाकडून करण्यात आलेल्या उपाययोजनांना यश आले असून, गळती बंद झाल्याने आता २२ गावांचा पाणीप्रश्न या वर्षी सुटला आहे. १८ लाख रुपये खर्च करून ही गळती बंद करण्यात आली आहे.
कोथुर्डे धरण हे रायगड परिसरात असून, गेल्या काही वर्षांत या धरणाला गळती लागली होती. रायगड विभागासह महाड नगरपालिका आणि दासगाव विभागातील २२ गावांची तहान भागविणारे कोथुर्डे हे एकमेव धरण आहे. गळतीमुळे एप्रिल महिन्यातच धरणाची पातळी घसरत असल्याने या गावांना पाणीटंचाईला तोंड द्यावे लागत होते. लघू पाटबंधारे विभागाने ही गळती काढण्यासाठी १८.८० लाख रु पये खर्च केला. हे धरण पाणी सोडण्याच्या ठिकाणी आणि काही ठिकाणी मातीच्या भिंतीजवळ गळती लागली होती. यामुळे सेकंदाला १० ते १५ लिटर पाणी म्हणजे जवळपास ३० टक्के पाणी वाया जात होते.
या धरणाची गळती थांबवण्यासाठी धरणाच्या मातीच्या भिंतीबाहेरून एक दगडी भिंत तयार करण्यात आली. वाळूची गाळणी (सँडफिल्टर) तयार करून त्यावर मातीचा थर टाकण्यात आला. या मातीत एक रासायनिक द्रव टाकण्यात आला. या प्रक्रि येमुळे या धरणाची गळती थांबली आहे. गळती रोखल्यामुळे पाणीसाठा कायम राहून गावांचा पाणीप्रश्न दूर झाला आहे. अद्याप तरी या गावांना पाणीपुरवठा करण्यात आलेला नाही. या धरणाची एकूण क्षमता ही २.७२ द.ल.घ.मी. आहे. महाड नगरपालिकेस या धरणातून १.११ द.ल.घ.मी. पाणी उपलब्ध होते. धरणाच्या गळतीमुळे ३० टक्के वाया जाणारे पाणी आता थांबले असून, या वर्षी धरणाच्या पाण्याचा साठा वाढला आहे. यामुळे गावांची पाणीसमस्या दूर झाली आहे.
रायगड आणि दासगाव विभागातील कोकरे, आडीअंबार्ले, मांडले, मोहोप्रे, नांदगाव खु., नांदगाव बु., नाते, तळोशी, वहूर, वरंडोली, चापगाव, दासगाव, गांधारपाले, केंबुर्ली, खर्र्डी, किंजळोली बु., किंजळोली खु., लाडवली, वाळसुरे, करंजखोल, गोंडाळे आणि आचळोली या गावांच्या पाणी योजना या गांधारी नदीवरील याच धरणाच्या पाण्यावर अवलंबून आहेत. कोथुर्डे धरणातून आॅक्टोबर ते एप्रिल या दरम्यान केवळ दोन ते तीन वेळा हे पाणी गांधारीच्या पात्रात सोडण्यात येते आणि धरणापासून १० कि.मी. ते १२ कि.मी. दूरवर गांधारीलगत असणाऱ्या या ग्रामपंचायतीच्या जॅकवेलने हा पाण्याचा पुरवठा होत असतो. नदीत सोडले जाणारे पाणी पाइपलाइनद्वारे गावाच्या जॅकवेलना जोडले गेले तर वाया जाणारे पाणीदेखील वाचू शकणार आहे.
तीन वर्षांचे यशस्वी प्रयत्न
धरणाच्या गळतीच्या अनुषंगाने पाटबंधारे विभागाच्या अभियंत्यांनी अभ्यास करताना, स्थानिक ग्रामस्थांकडून प्राप्त माहिती देखील विचारात घेण्यात आली. तीन वर्षे सातत्यपूर्ण प्रयत्न, सॅन्ड फिल्टर व आधुनिक गळती प्रतिबंधक प्रक्रिया याच्या मिलाफातून ही गळती आता कायमस्वरुपी थांबविण्यात अभियंत्यांना यश आले आहे.
गेली तीन वर्षे नियोजनबद्ध काम करत धरणाची गळती १०० टक्के थांबवण्यात आली आहे, यामुळे अद्यापि पाण्याचा साठा आहे. नदीत सोडले जाणारे पाणी मोठ्या प्रमाणात वाया जाते. धरणातून पाइपलाइनद्वारे हे पाणी जॅकवेलना जोडले तर पाणीपुरवठा सुरळीत होऊन पाणीटंचाई समस्या राहणार नाही.
- प्रकाश पोळ, शाखा अभियंता,
जलसंपदा पाटबंधारे विभाग