मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे ‘विघ्न’; खड्ड्यांमुळे खडतर प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2019 10:49 PM2019-09-09T22:49:41+5:302019-09-10T06:33:03+5:30

रस्ता नूतनीकरणाकडे दुर्लक्षित होत असल्याचा ग्रामस्थांचा आरोप; प्रवासी त्रस्त

'Disruption' of pits on Mumbai-Goa highway; Rough travel due to pits | मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे ‘विघ्न’; खड्ड्यांमुळे खडतर प्रवास

मुंबई-गोवा महामार्गावर खड्ड्यांचे ‘विघ्न’; खड्ड्यांमुळे खडतर प्रवास

googlenewsNext

माणगाव : मुंबई-गोवा महामार्गावर लोणेर ते इंदापूर दरम्यान अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. तसेच या महामार्गाच्या नूतनीकरणचे काम चालू असल्याने ठरावीक अंतरावर नवीन काँक्रीटीकरण झाले आहे; मात्र या रस्त्याला जुना रस्ता एकत्र करताना अनेक ठिकाणी रस्ता वळवण्यात आला आहे. यामुळे नुसतीच खडीची मलमपट्टी केल्याने मोठे मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे सर्व महामार्गाची दैना उडालेली दिसत आहे. गणेशोत्सवासाठी आलेल्या गणेशभक्तांचा परतीचा प्रवास सुरू झाला असून या वळणांमुळे मोठी अडचण वाहतुकीदरम्यान येत आहे. याच बरोबर या पडलेल्या खड्ड्यांमुळे वाहतूक मंद गतीने सुरू असून वाहतूककोंडी होत आहे.

मुंबई-गोवा महामार्गावर माणगाव तालुक्यात ऊसरघर, कुरवडा फाटा, गारळ, तळेगाव, तिलोरे, कोशिंबळे अशा अनेक ठिकाणी अपूर्ण रस्त्यामुळे रस्ता वळवण्यात आला आहे. या ठिकाणी नुसती खडी व ग्रिडचा वापर करून मलमपट्टी केली आहे, ती पावसात टिकत नसून तिथे मोठे मोठे खड्डे पडले आहेत. यामुळे चालकांना या ठिकाणी गाडी चालविणे अवघड झाले आहे. या ठिकाणी वारंवार खडी असल्याने दुचाकी घसरून अपघाताच्या घटना घडत आहेत.

तसेच हा महामार्ग तयार करीत असताना काही ठिकाणी भराव केल्याने जुना रस्ता पाण्याखाली येत आहे. या ठिकाणी पाऊस आला की पाणी साचत आहे, निचरा होत नाही.अशा ठिकाणी कोणतीही चारचाकी गाडी गेली असता जवळच दुचाकीस्वार आला तर त्या पाण्याने त्या दुचाकीस्वाराची आंघोळ होते. या रस्त्यावरून जाताना चालकांना खूपच कसरत करावी लागत आहे.

माणगावपासून इंदापूरकडे जाताना दोन किलोमीटर अंतरावर पेण खरवली फाट्यावर महामार्गाचे काम चालू असल्याने साइडपट्टी नसल्याने त्या ठिकाणी मागील दोन महिन्यात अनेक अपघात झाले असून अनेक जणांना प्राण गमवावा लागला आहे. या ठिकाणी सूचना फलक लावण्याची गरज असून तशी मागणी होत आहे.

चाकरमान्यांचा परतीचा प्रवास जिकिरीचा
१) पेण : मुंबई-गोवा महामार्गावर गेला आठवडाभर मुसळधार पाऊस पडतो आहे. अवजड वाहतुकीमुळे महामार्गावर वडखळ नाका ते पेण भोगावती पुलापर्यंत ७ किमी पट्टा खड्डेमय झाला आहे. ठेकेदार कंपनीने अंतोरा फाटा ते रामवाडी पुलापर्यंत खड्डे बुजविण्याचे काम सतत करावे लागत असल्याने या ठिकाणी पेव्हर ब्लॉक बसविले आहेत. मात्र खड्डे जागोजागी असल्याने ही तात्पुरती मलमपट्टी ठरत आहे.

२) रामवाडी विभागीय बस स्थानकात रात्री येणाऱ्या कोकणातील एसटी बसेना या खड्ड्यातून प्रवास करावा लागतो आहे. यावर्षी जास्तीत जास्त कोकणातील चाकरमानी रेल्वेनेच परतीचा प्रवासाला पसंती देऊन मुंबईकडे जाताना दिसतात.

३)महामार्गावर दुपारी ४ ते सायंकाळी ७.३० पर्यंत थोडीफार वाहतूककोंडी निर्माण होते. एकंदर मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूककोंडी व खड्ड्यांमुळे चाकरमान्यांचा परतीचा प्रवास जिकिरीचा बनला आहे.

वाहतूककोंडीची समस्या
पोलादपूर : महामार्गवर शेकडो एसटी बसेससह हजारो लहान चारचाकी गाड्या आल्याने पोलादपूर बसस्थानाक परिसर महाड, माणगांव, इंदापूर, वडखळ आदी ठिकाणी वाहतूक कोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे त्यातच अनेक ठिकाणी खड्डेमय मार्ग असल्याने वाहनाचा वेग मंदावत आहे. या कोंडीचा प्रवाशांना त्रास होत असून पावसामुळे प्रवासातील अडचणी वाढल्याचे दिसून आले आहे.

Web Title: 'Disruption' of pits on Mumbai-Goa highway; Rough travel due to pits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.