- मयूर तांबडे ।पनवेल : तालुक्यातील गाढी नदीवर बांधण्यात आलेला चिपळे पूल धोकादायक अवस्थेत आहे. पुलाच्या खालील बाजूस असणाऱ्या लोखंडी सळ्या दिसू लागल्याने पुलावरून वाहतूक करणे धोकादायक झाले आहे. त्यामुळे या पुलाचे डागडुजीकरण करणे आवश्यक आहे. वेळेत लक्ष न दिल्यास पूल कोसळण्याची भीती व्यक्त केली जात आहे.तालुक्यातील गाढी नदीवर बांधण्यात आलेला चिपळे पूल सन १९७५ साली बांधण्यात आलेला आहे. या पुलाची लांबी ६६ मीटर, रुंदी ६.७० मीटर तर उंची ६.१० मीटर आहे. तालुक्यातील चिपळे, कोप्रोली, नेरे, शांतीवन, वाजे, धोदाणी या गावांसह आदिवासीवाड्यांना जोडणाºया पुलाची अवस्था दयनीय झाली आहे. या पुलाच्या वरील रस्ता चकाचक दिसत असला, तरीदेखील पुलाच्या खालील बांधकामाचे स्टील उघडे पडले असून, ते गंजू लागले आहे. त्यामुळे हा पूल खचण्याची भीती येथील नागरिकांना वाटत आहे. या पुलाचे आयुष्यमान ५० वर्षे असून, सद्य:स्थितीत या पुलाला ४३ वर्षे होऊन गेलेली आहेत. या परिसरात नागरीकरण वाढल्याने वाहनांची संख्यादेखील मोठ्या प्रमाणात वाढली आहे. त्यामुळे या ठिकाणी दुसरा पूल बांधण्याची आवश्यकता असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.पनवेल तालुक्यातील महत्त्वाच्या असणाºया चिपळे पुलाची अवस्था धोकादायक झाली आहे. परिसरात महत्त्वपूर्ण प्रकल्प येऊ घातल्याने नागरिक मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आलेले आहेत. त्यामुळे या पुलावरून दररोज मोठ्या प्रमाणात वाहने ये-जा करीत असतात. २००५ साली आलेल्या महापुरामध्ये या पुलाचे मोठे नुकसान झाले होते. पुराचा तडाखा बसल्याने पुलाच्या एका बाजूला खड्डा पडला होता. या वेळी पुलाची डागडुजी करण्यात आली होती. सद्य:स्थितीत पुलाच्या खालील लोखंडी सळ्या दिसत असून, पूल धोकादायक अवस्थेत आहे. पुलाच्या वरील लोखंडी रेलिंगदेखील तुटले आहे. या पुलाची डागडुजी केली नाही, तर अनुचित प्रकार घडण्याची शक्यता आहे. हा पूल धोकादायक असल्याचा अहवाल देण्यात आलेला आहे. त्यामुळे या पुलाच्या डागडुजीकरणाची मागणी केली जात आहे.या पुलाचे जून २०१७मध्ये स्ट्रक्चरल आॅडिट करण्यात आले असून, पूल दुरुस्तीसाठी ४0 लाख रु पयांचा खर्च आहे. त्यानुसार अंदाजपत्रक तयार करून ते सर्कलला पाठविण्यात आलेले आहे. पुलाला स्ट्रक्चरल रिपेअरची आवश्यकता आहे. त्याप्रमाणे ते करणार आहोत. सध्या दुसºया पुलाची आवश्यकता नाही.- एस. एम. कांबळे, उपअभियंता, सार्वजनिक बांधकाम विभागचिपळे पुलाची अवस्था दयनीय झालेली आहे. कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी त्याची डागडुजी करण्यात यावी.- धनंजय पाटील, उपसरपंच,चिपळे ग्रामपंचायत
गाढी नदीवरील पूल धोकादायक, सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुरुस्तीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:00 AM