फौजी आंबवडेत आरोग्य शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 18, 2018 01:06 AM2018-01-18T01:06:05+5:302018-01-18T01:06:33+5:30
फौजी आंबवडे गावात आरोग्य सुविधा चांगल्या प्रकारे मिळावी या हेतूने आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून महाड व परिसरातील डॉक्टर आणि ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या
अलिबाग : फौजी आंबवडे गावात आरोग्य सुविधा चांगल्या प्रकारे मिळावी या हेतूने आणि सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून महाड व परिसरातील डॉक्टर आणि ‘लोकमत’ यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या २६ जानेवारी भारतीय प्रजासत्ताक दिनीच गावातील सैनिक, माजी सैनिक व त्यांचे कुटुंबीय यांच्याकरिता मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन केले आहे.
‘फौजी आंबवडे विकासापासून वंचित’या वृत्तातून ‘लोकमत’ने शासकीय निष्क्रियता सर्वांसमोर आणल्यावर जिल्ह्यातील अनेकांनी फौजी आंबवडे गावातील सैनिक आणि माजी सैनिकांच्या कुटुंबीयांकरिता सामाजिक बांधिलकी आणि राष्ट्रप्रेमाच्या भावनेतून काही तरी करायचा प्रस्ताव ‘लोकमत’शी बोलताना सांगितला होता.
महाडमधील डॉ.चेतन सुर्वे, डॉ.सुनील शेठ आणि डॉ.चंद्रशेखर दाभाडकर हे या आरोग्य शिबिराचे नियोजन करीत आहेत. प्रजासत्ताक दिनी पूर्व नियोजित कार्यक्रम असतात, परंतु यंदा आम्ही सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून या आरोग्य शिबिराकरिता वेळ देवून आरोग्य तपासणी व उपचार करणार असल्याचे डॉ.चेतन सुर्वे यांनी सांगितले. तर प्रजासत्ताक दिनी सैनिक, माजी सैनिक आणि त्यांचे कुटुंबीय यांची आरोग्य तपासणी आम्ही करू शकणार असल्याने यंदाचा प्रजासत्ताक दिनी संस्मरणीय होईल, अशी भावना डॉ.सुनील शेठ यांनी व्यक्त केली. सामाजिक कार्यकर्ते मोहन शेठ यांनी देखील संपूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगितले. या आरोग्य शिबिरात विविध शाखांचे एकूण १५ डॉक्टर्स सहभागी होतील असा विश्वास डॉ.चंद्रशेखर दाभाडकर यांनी व्यक्त केला आहे.
फौजी आंबवडे गावात आरोग्य सुविधा चांगली असल्याचा दावा जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने केला आहे. मात्र फौजी आंबवडे येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्र कायमच बंदावस्थेत असते, कधीतरी पंधरा दिवसातून एकदा एखादी परिचारिका येऊन जाते. हे उपकेंद्र बंद असल्याने गावातील रुग्णांना विन्हेरे आरोग्य केंद्र अथवा महाड ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी जावे लागते. मात्र या उपकेंद्रात आरोग्य अधिकारी कधीच फिरकत नाहीत. आरोग्य विभागाचा दावा योग्य नसल्याचे फौजी आंबवडे येथील ग्रामस्थ सचिन पवार यांनी बुधवारी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.