मोरगिरी येथील घराला आग; लाखो रुपयांचे नुकसान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 10, 2019 11:39 PM2019-02-10T23:39:54+5:302019-02-10T23:40:02+5:30
तालुक्यातील मोरगिरी येथील लग्नकार्यासाठी बाहेर गेलेले प्रकाश शिंदे यांच्या घराला रविवारी सकाळी १० ते १०.२० वाजण्याच्या दरम्यान आग लागली. या वेळी रोख रकमेसह घरातील साहित्य जळून खाक झाले.
पोलादपूर : तालुक्यातील मोरगिरी येथील लग्नकार्यासाठी बाहेर गेलेले प्रकाश शिंदे यांच्या घराला रविवारी सकाळी १० ते १०.२० वाजण्याच्या दरम्यान आग लागली. या वेळी रोख रकमेसह घरातील साहित्य जळून खाक झाले. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी ग्रामस्थांनी शर्थीचे प्रयत्न करत घराची भिंत व दरवाजा तोडून सिलिंडर बाहेर काढून पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविण्याचा अथक प्रयत्न केला. अर्ध्या तासानंतर महाड येथील अग्निशमन बंब दाखल झाल्यानंतर आग पूर्ण विझली असली तरी लाखो
रु पयांचे नुकसान झाले आहे.
प्रकाश गोविंद शिंदे (रा. मोरगिरी) हे शेतीचा व्यवसाय करत असून ग्रामपंचायतीमध्ये शिपाई म्हणून कार्यरत आहेत. रविवारी सकाळी काटेतळी येथे लग्नकार्याला गेले असता घराला शॉर्टसर्किटमुळे आग लागली असावी, असा प्राथमिक अंदाज असून या आगीत ४० हजारांची रोकड व साडेतीन ते चार तोळ्यांचे दागिने असा ऐवज व संपूर्ण लाकडी साहित्य जळून खाक झाले. त्याचप्रमाणे घरातील तांब्या, पितळेची व स्टील भांड्यांचे नुकसान झाले आहे.
आग लागल्याचे वृत्त समजताच ग्रामस्थांनी प्रथम घराची भिंत व दरवाजा तोडून घरातील सिलिंडर बाहेर काढून मिळेल त्या साहित्याने पाण्याचा मारा केला. मात्र, लाकडी वासे व कौलारू घर असल्याने आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी महाड येथील अग्निशमनच्या बंबाची प्रतीक्षा करावी लागली. २२ किमीचा रस्ता कापत अग्निशमनची गाडी सुमारे अर्ध्या तासानंतर घटनास्थळी आली असता आगीवर नियंत्रण मिळविले. मात्र, तोपर्यंत घरातील कपडे, लाकडी कपाट, शोकेससह तांदुळाची पोटी, आदीसह विद्युत साहित्य जळून खाक झाले. आगीचे वृत्त कळताच पोलादपूर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.