जिल्ह्यात पाच दिवस माघी गणेशोत्सवाची धूम
By admin | Published: February 10, 2016 03:05 AM2016-02-10T03:05:40+5:302016-02-10T03:05:40+5:30
माघ महिन्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला. गुरुवारी श्री गणेश जयंतीनिमित्त पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळांमधून तब्बल १०० मोठ्या गणेशमूर्ती रवाना देखील झाल्या आहेत. सार्वजनिक माघी
पेण : माघ महिन्यास मंगळवारपासून प्रारंभ झाला. गुरुवारी श्री गणेश जयंतीनिमित्त पेणच्या गणेशमूर्ती कार्यशाळांमधून तब्बल १०० मोठ्या गणेशमूर्ती रवाना देखील झाल्या आहेत. सार्वजनिक माघी गणेशोत्सव मंडळाचा पाच दिवसांचा उत्सवाचा थाटमाट १५ फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे. याशिवाय गावोगावी व अष्टविनायकांच्या स्थानी माघी गणेश जयंतीनिमित्ताने गणेशभक्तांसाठी बाप्पाच्या मंगलमय दर्शनाची सुवर्णसंधी लाभणार असून विविध धार्मिक व रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल यानिमित्ताने ठेवण्यात आली आहे. पुढील पाच दिवस बाप्पांच्या उत्सवाचा माहोल नंतर शिवजयंतीचा माहोल यामुळे माघातला पुढचा आठवडा रसिकजनांसाठी आनंदाची पर्वणी घेवून येणार आहे.
गणेशोत्सवाची हौसमौज न्यारीच असते. यामध्ये युवा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची हौस भारीच असते. भाद्रपदातील गणेशोत्सव, साखरचौथ गणेशोत्सव, नंतर माघातला गणेशोत्सव यांचा थाटमाट सारखाच असतो. अलीकडे माघी सार्वजनिक गणेशोत्सव पेण, उरण, अलिबाग, पुणे, पिंपरी चिंचवड, मुंबई उपनगरे आदी ठिकाणी भव्य दिव्य प्रमाणात साजरा होऊ लागला आहे. पेण व हमरापूर जोहे पट्ट्यातील निवडक अशा प्रसिद्ध कार्यशाळांमधून १०० मोठ्या मूर्ती माघातल्या गणेशोत्सवासाठी आकर्षक रंगसंगतीने नटूनथटून रवानादेखील झाल्यात. पेणच्या दीपक कला केंद्रातून तब्बल ३० गणेशमूर्ती पुणे, मुंबई या मोठ्या शहरामध्ये माघी गणेशोत्सवासाठी रवाना झाल्याचे मूर्तिकार सचिन व नीलेश समेळ या बंधूंनी सांगितले. स्थानिक परिसरातील हमरापूर जोहे पट्ट्यातील कार्यशाळांमधून उर्वरित गणेशमूर्ती नेण्यात आल्या. (वार्ताहर)