कुलाबा किल्ल्यात गणेशभक्तांची गर्दी
By Admin | Published: February 11, 2016 02:42 AM2016-02-11T02:42:51+5:302016-02-11T02:42:51+5:30
ऐतिहासिक कुलाबा किल्ल्यामधील सिद्धिविनायकच्या मंदिरामध्ये गुरुवारी माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणरायाचे दर्शन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे.
अलिबाग : ऐतिहासिक कुलाबा किल्ल्यामधील सिद्धिविनायकच्या मंदिरामध्ये गुरुवारी माघी गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे. गणरायाचे दर्शन आणि महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडणार आहे. उत्सव समितीच्या कार्यकर्त्यांनी बुधवारीपासूनच कुलाबा किल्ल्यात तळ ठोकला असून, उत्सवाची तयारी पूर्ण केली आहे. हजारोच्या संख्येने भाविक सिद्धिविनायकाचे दर्शन घेणार आहेत.
दर वर्षी माघी गणेशोत्सव किल्ल्यातील सिद्धिविनायकाच्या मंदिरात भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा करण्याची परंपरा आहे. माघी गणेशोत्सवाच्या दिवशी हजारोंच्या संख्येने भाविकांची पावले किल्ल्याकडे जातात. स्थानिकांसह पर्यटक मोठ्या संख्येने या दिवशी आपली उपस्थिती लावतात. किल्ल्याचा इतिहास आणि गणरायाचे दर्शन असा दुहेरी संगम त्यांच्याकडून साधला जातो.
माघी गणेशोत्सव समितीची पदाधिकारी सदस्य यांनी गेल्या तीन दिवसांपासून परिसराची साफसफाई केली आहे. भाविकांना दर्शन व्यवस्थित घेता यावे, यासाठी अलिबाग नगरपालिकेच्या वतीने मंदिराच्या परिसरात बॅरिकेटस् लावण्यात आले आहेत.
पिण्याच्या पाण्याचीही व्यवस्था करण्यात आली आहे. हार-फुले, मिठाई, वडापाव, भेळपुरी, पाणीपुरी यांचेही येथे स्टॉल उभारण्यात येणार आहेत. मंदिर आणि किल्ल्यात विद्युत रोषणाई करण्यात आली आहे.
भरतीच्या वेळी अलिबाग कस्टम कार्यालय येथील जेटीवरून नेहमीप्रमाणे बोटी किल्ल्यापर्यंत प्रवाशांना नेणार आहेत. (वार्ताहर)