आजींचा ३ दिवसांत ६५ किमीचा प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 12:46 AM2018-04-20T00:46:17+5:302018-04-20T00:46:17+5:30
७५ वर्षांच्या आजीबाई सलग दोन दिवस ५५ कि.मी. अंतर चालू शकतात, यावर खरतर कुणाचा विश्वास बसणार नाही; परंतु हे वास्तवात घडले आहे. या आजीबार्इंचे नाव अनसूया काळूराम गायकवाड असून, त्या पाली-सुधागड तालुक्यातील नानोशी गावात राहतात.
- जयंत धुळप
अलिबाग : ७५ वर्षांच्या आजीबाई सलग दोन दिवस ५५ कि.मी. अंतर चालू शकतात, यावर खरतर कुणाचा विश्वास बसणार नाही; परंतु हे वास्तवात घडले आहे. या आजीबार्इंचे नाव अनसूया काळूराम गायकवाड असून, त्या पाली-सुधागड तालुक्यातील नानोशी गावात राहतात. अलिबाग जिल्हा रुग्णालयातून सोमवारी रात्री १२ वाजण्याच्या सुमारास अनसूया काळूराम गायकवाड यांनी चालायला प्रारंभ केला आणि तब्बल ६५ कि.मी.चे अंतर चालून त्या गुरुवारी सकाळी ८च्या सुमारास पाली-सुधागड तालुक्यातील नानोशी गावी घरी पोहोचल्या.
अनसूया आजीबार्इंची नातसून जोया विवेक पवार हीस येथील जिल्हा सरकारी रुग्णालयात प्रसूतीकरिता दाखल करण्यात आले होते. तिच्या सोबत अनसूया आजी आणि त्यांचा नातू विवेक विनय पवार हे दोघेही रुग्णालयात आले होत. सोमवारी नातसुनेची प्रसूती झाली.
पणतू झाल्याच्या आनंदात अनसूया आजी प्रसूती वॉर्डमध्ये मोठ्याने बोलत होत्या. त्या वेळी कुणीतरी त्यांना तुम्ही खाली जा, असे सांगितले. त्यावर त्या काहीशा रागावल्या आणि रुग्णालयाच्या खाली आल्या. सोमवारी रात्रीचे बारा वाजले तरी अनसूया आजी वरती वॉर्डमध्ये परत आल्या नाहीत, म्हणून नातू विवेकने त्यांना खाली जाऊन पाहिले. त्यास आजी दिसली नाही.
मंगळवारी दिवसभर विवेकने आजीचा शोध घेतला तरीही आजी सापडली नाही. अखेर बुधवारी सकाळी अलिबाग पोलीसस्टेशन गाठून आजी हरवल्याची तक्रार दिली. अलिबाग पोलीसठाण्यातील हवालदार पांडूरंग गभाले यांनी विवेक पवार याच्याशी संवाद साधून, त्यांच्या पाली व अन्यत्रच्या नातेवाइकांचे मोबाइल नंबर घेऊन, त्यांच्याशी संपर्क साधण्यास प्रारंभ केला. मात्र,
तरीही आजीचा शोध लागला नाही.
गुरुवारी सकाळी त्यांनी पुन्हा सर्व नातेवाईक आणि आपले सहकारी पोलीस कर्मचारी यांच्याशी सतत संपर्क ठेवला आणि ८ वाजण्याच्या सुमारास गभाले यांनी अनसूया आजींची मुलगी मनीषा गायकवाड यांना फोन लावला आणि त्यांचा जीव भांड्यात पडला.
आजी अलिबागहून चालत आताच (८.३०वा.) घरी पोहोचली आहे, असे मनीषा यांनी गभाले यांना सांगितले. त्यांनी तत्काळ नातू विवेक पवार याच्याशी संपर्क करून आजी सापडली आणि ती पालीला घरी पोहोचल्याचे सांगितले.
ज्येष्ठ नागरिकांना केवळ आपुलकीचा हवा संवाद
- रागावलेल्या अनसूया आजीबार्इंनी अलिबाग ते पाली-नानोशी हे सुमारे ६५ कि.मी.चे अंतर तीन दिवस आणि दोन रात्रीचा पायी प्रवास करून आपले घर गाठले. हे धाडसाचे जसे आहे, तसेच सामाजिक व नाते संबंधांतील चिंतनाचे देखील आहे. ज्येष्ठ नागरिकांना केवळ संवेदनशीलतेचा आपुलकीचा संवाद हवा असतो. त्यात काही कमी-जास्त झाले, तर अशा निर्णयास ते पोहोचू शकतात. अशी वेळच येणार नाही, यासाठी सर्वांनीच प्रयत्न करणे गरजेचे असल्याची अपेक्षा पोलीस हवालदार पांडूरंग गभाले यांना मार्गदर्शन करणारे अलिबाग पोलीसठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेश वराडे यांनी व्यक्त केली आहे.