रायगड जिल्ह्याला पावसाचा जोरदार तडाखा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 02:09 AM2020-08-06T02:09:49+5:302020-08-06T02:10:56+5:30
जिल्ह्याला पावसाने सलग दुसऱ्या दिवशी जोरदार तडाखा दिला आहे. अतिवृष्टीने अलिबाग, रोहा, माणगाव, महाड तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. ...
जिल्ह्याला पावसाने सलग दुसऱ्या दिवशी जोरदार तडाखा दिला आहे. अतिवृष्टीने अलिबाग, रोहा, माणगाव, महाड तालुक्यांमध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावर दरड कोसळल्याने वाहतूक ठप्प आहे. माणगाव-सोन्याच्या वाडीमधील ८६ नागरिकांना पुराच्या पाण्यातून वाचविले आहे. त्याचप्रमाणे, काळ नदीमध्ये एक युवक वाहून गेला आहे. संबंधित यंत्रणांनी सतर्क राहावे, अशा सूचना जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी दिल्या आहेत. अलिबाग तालुक्यातही पावसाने आपले रौद्ररूप दाखविले आहे. बोर्ली-मांडला ते महाळुंगे काकळघर दिशेने जाणाºया मार्गावरील मांडला गावापासून जवळच सोमाई नदीला पूर आला आहे. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक तात्पुरत्या स्वरूपात बंद करण्यात आली आहे. रामराज पुलावरूनही पुराचे पाणी जात असल्याने वावे-रामराज हा मार्गही वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. त्यामुळे गावातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे. विविध ठिकाणच्या सखल भागांमध्ये पाणी साचल्याने नागरिकांचे चांगलेच हाल झाले.
माणगाव तालुक्यात मुसळधार पावसाचे थैमान
माणगाव : माणगाव तालुक्यात बºयाच दिवसांच्या विश्रांतीनंतर गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले असून, नागरिकांचे जनजीवन विस्कळीत होऊन माणगाव शहरातील काळनदी तुडुंब भरून तिने धोक्याची पातळी ओलांडली आहे. यातच एक तरुण डोहाच्या पाण्यात वाहून गेल्याची घटना माणगाव तालुक्यात घडली आहे.
माणगावात तीन दिवसांपासून जोरदार पर्जन्यवृष्टी होत असून, सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. माणगाव बाजारपेठेत व आसपास सर्वत्र जलमय परिस्थिती दिसत आहे. माणगाव बसस्थानक आवारात पाणीच पाणी झाले आहे.
रिळे पाचोळ, निळगुण या गावाचे रस्ते पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला आहेत, तसेच शेती पाण्याखाली गेल्याचे दृश्य दिसत आहेत.
आशुतोष कुचेकर (वय १९, रा. नागोठण)े हा युवक माणगाव तालुक्यातील निळज येथील डोहात बुडाला असून, त्याचा शोध सुरू असल्याचे माणगाव तहसील कार्यालयाकडून माहिती मिळाली.
दिघी माणगाव रस्त्यावर माणगावनजीक असणाºया पुलावरून पाणी आल्याने रस्ता वाहतुकीसाठी बंद केला आहे, तसेच मोर्बा घाटात दरड कोसळण्याची घटना घडली. ही दरड हटविण्याचे काम प्रशासनाने केले.
चौल-रेवदंडाला
झोडपले
लोकमत न्यूज नेटवर्क
रेवदंडा : सलग दुसºया दिवशी चौल-रेवदंडा परिसराला पावसाने झोडपून काढले. अनेक सखल भागात पाणी साचले. बळीराजाने शेतात पाणी असल्याने भातलावणीची कामे आज बंद ठेवलेली दिसत होती. मात्र, पाऊस स्थिरावल्याने बळीराजा सुखावला आहे.
या वर्षी चक्रीवादळानंतर काही दिवसांनी पावसाला सुरुवात झाली, तरीही पाऊस जुलै महिन्यात स्थिरावला नाही. आता मात्र, गेले तीन दिवस पावसाने दमदार हजेरी चालू ठेवल्याने परिसरातील नदी, नाले, विहिरी व तलाव यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. बाजारात पूर्णपणे शुकशुकाट पसरला आहे.
दरम्यान, या पावसाबरोबर अनेक तास बत्ती गुल असल्याने ग्रामस्थ हैराण झाले असून, गणेशमूर्ती बनवणाºया कार्यशाळांना खंडित विद्युत पुरवठ्याचा चांगलाच फटका बसला.
८६ नागरिकांना सुखरूप बाहेर काढले
माणगाव : माणगाव तालुक्यातील गोरेगावजवळील सोन्याची वाडी येथे पुराच्या पाण्यात बुधवारी १०० ग्रामस्थ अडकले. त्यापैकी ८६ जणांची सुटका करण्यात प्रशासनाला यश आले.
पाण्याची पातळी वाढत असल्याची माहिती प्रशासनाला मिळताच, माणगावचे नायब तहसीलदार भाबड , मंडळ अधिकारी पाटील, तलाठी पवार, सरपंच श्रुती कालेकर, पोलीस निरीक्षक ए जी. टोम्पे यांच्यासह सर्व महसूल आणि पोलीस कर्मचारी यांनी महाड येथील प्रशांत साळुंखे यांच्या राफटर पथकाला तत्काळ पाचारण केले. पथकातील सदस्यांनी बोटीच्या सहायाने रेस्क्यू आॅपरेशन सुरू केले. ८६ ग्रामस्थांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी हलविले.