होळी, धूलिवंदन उत्साहात : इको फ्रेंडली रंगांना प्राधान्य; समुद्रकिनारे फुलले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 3, 2018 02:26 AM2018-03-03T02:26:23+5:302018-03-03T02:26:23+5:30
सप्तरंगांची उधळण आणि मनसोक्तपणे पाण्यात भिजण्याचा आनंद धुळवडीच्या दिवशी जिल्ह्यात सर्वत्र दिसून आला.
अलिबाग : सप्तरंगांची उधळण आणि मनसोक्तपणे पाण्यात भिजण्याचा आनंद धुळवडीच्या दिवशी जिल्ह्यात सर्वत्र दिसून आला. एकमेकांना रंग लावून धुळवडीच्या शुभेच्छा देत अतिशय जल्लोषात धुळवडीचा सण साजरा करण्यात आला. अलिबाग शहरातील बच्चे कंपनीने इको फ्रेंडली रंगांचा वापर करुन ते रंगाच्या उत्सवात चांगलेच न्हाहून निघाल्याचे दिसून आले. होळी सणानिमित्त काही पर्यटकही दाखल झाले होते. त्यांनीही स्थानिकांच्या रंगात रंग मिसळवून सप्तरंगांची उधळण केली.
गुरुवारी होळी सणाच्या दिवशी वाईट विचार, आळस, निराशा, दारिद्र्य यांचे दहन करुन झाल्यानंतर शुक्रवारी जिल्ह्यातील विविध भागांमध्ये धूलिवंदन धूमधडाक्यात साजरे करण्यात आले. रायगड जिल्हा हा उद्योगांचा जिल्हा असल्याने येथे परप्रांतीयांची संख्या दखल घेण्याइतपत वाढलेली आहे. धूलिवंदनाच्या दिवशी रंग खेळण्याचीही त्यांची पध्दत मराठी माणसाने कधी अंगीकारली हे त्यालाही कळले नाही. पुढे धूलिवंदनाच्या दिवशीच रंग खेळण्याचा नवा ट्रेंड सुरु झाला आणि तो आता बºयापैकी मराठी, गुजराती, मारवाडी अशा समाजातील लोकांमध्ये रुजल्याचे ते धूलिवंदनाच्या दिवशी सहज दिसून येते. होळी सणाच्या पाच दिवसानंतर रंगपंचमी खेळण्याची खरी पध्दत मराठी सणांमध्ये समाविष्ट आहे, परंतु ही रंगपंचमी नव्या पिढीला क्वचितच माहिती असेल.
धूलिवंदनाचा वाढता ट्रेंडच आता रंगोत्सवाचा सण झाला असल्याने तो जिल्ह्याच्या कानाकोपºयात खेळला जात आहे. शुक्रवारी जिल्ह्यातील महत्त्वाच्या समुद्र किनारी स्थानिकांसह पर्यटकांनी तोबा गर्दी केली होती. नाक्या-नाक्यावर तरुणांचे जथ्ये एकमेकांवर रंगांची उधळण करीत होते. यावेळी इकोफ्रेंडली रंगाला प्राधान्य देण्यात आले.
>रंग खेळून झाल्यावर सर्वांची पावलेही समुद्रकिनारी जाताना दिसत होती. समुद्राच्या पाण्यात मुक्तपणे डुंबत त्यांनी आपल्या अंगावरचे रंग उतरवले. समुद्रकिनारी पर्यटकही मोठ्या संख्येने आले होते. त्यांनीही समुद्र स्नानाचा आनंद घेतला. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी जीव सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले होते.
>महाडमध्ये
होलिकोत्सव उत्साहात
महाड : महाड शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात होलिकोत्सव मोठ्या उत्साहात आणि पारंपरिक पद्धतीने साजरा करण्यात आला. सायंकाळी अनेक ठिकाणी होळीच्या लाकडाच्या वाजतगाजत मिरवणुका काढण्यात आल्या. गावदेवी श्री जाखमातादेवीची मानाची होळी रात्री विधिवत पद्धतीने लावण्यात आली.
होलिकोत्सवानिमित्त शहर व ग्रामीण भागात मुंबई, पुणे आदी शहरात वास्तव्यास असलेले चाकरमानी मोठ्या संख्येने आपल्या मूळ गावी दाखल झाले आहेत. सणासुदीला कुठल्याही प्रकारचा वाद होऊ नये यासाठी सर्वत्र पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता.
>कर्जतमध्ये धुळवड
कर्जत : कर्जत तालुक्यात होळी व धुळवड मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. लहान मुलांना होळीचे वेध दोन दिवस आधीपासूनच लागले होते. तालुक्यात कमीत कमी पाण्याचा वापर करून, विविध सुक्या रंगांचा वापर करून धुळवड साजरी करण्यात आली.
>होळी उत्साहात
रेवदंडा : ढोल-ताशांच्या गजरात रेवदंड्यात होळी, धुळवड साजरी करण्यात आली. चाकरमानी मंडळी मोठ्या संख्येने गावाकडे दाखल झाल्याने गावात उत्साह जाणवत होता. दरम्यान, वीज वितरण कंपनीकडून वारंवार विद्युत पुरवठा खंडित होत असल्याने चाकरमानी मंडळींनी नाराजी व्यक्त केली. कुठेही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा सज्ज आहे.
>किनाºयावर गर्दी
आगरदांडा : कोकणात लोकप्रिय ठरलेला होलिकोत्सव गुरुवारी पारंपरिक पद्धतीने साजरा करताना केळी,आंबा, नारळ सुपारीच्या फांद्यांचे पूजन करण्यात आले. जवळच्या वाडीत जाऊन होळी आणून व ती सजविणे यामध्ये बच्चे कंपनीचा पुढाकार महत्त्वाचा होता. होळी पूजनाला सुवासिनींची गर्दी होती. प्रत्येक गावाच्या व समाजाप्रमाणे तसेच प्रथेप्रमाणे होलिकोत्सव साजरा करण्यात आला. अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आले होते. उत्तर भारतीय समाजाकडून मुरु ड समुद्राजवळील भंडारी बोर्डिंगजवळ होळी मिलन समारंभ आयोजित करण्यात आला होता. या वर्षी बारावी व दहावीच्या परीक्षा सुरू असल्याने मुरु डमध्ये पर्यटकांची संख्या कमी होती.
>उत्साह द्विगुणित
नागोठणे : शहरातील प्रत्येक आळीत लावण्यात आलेल्या सार्वजनिक होळीची रात्री यथासांग पूजा अर्चा झाल्यानंतर दहन करण्यात आले. होळीच्या आदल्या दिवशी २७ फेब्रुवारीला येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीचा निकाल जाहीर झाला असल्याने विजयी उमेदवार तसेच त्यांच्या नेतेमंडळींनी संबंधित आळ्यांमध्ये जाऊन होळीची पूजा केली व नागरिकांना होळी सणाच्या शुभेच्छा दिल्याने नागरिकांचा उत्साह आणखी द्विगुणित झाला होता. गुरुवारी धुळवडीला आबालवृद्धांसह महिलावर्गही सहभागी होऊन एकमेकांवर रंगांची उधळण केली. जिल्हा परिषद सदस्य किशोर जैन, सरपंच डॉ. मिलिंद धात्रक यांनी धुळवडीचा आनंद लुटला.