उरण : जेएनपीटीने जासई-दास्तानफाटा दरम्यान सुरू केलेल्या ३० कोटी खर्चाच्या शिवस्मारकाचे रविवार, १७ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्र्यांंच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. याप्रसंगी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, ज्येष्ठ निरूपणकार डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी, संभाजीराजे भोसले, दुर्ग समितीचे अध्यक्ष खा. श्रीरंग बारणे, पालकमंत्री रवींद्र चव्हाण, रामशेठ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत होणाऱ्या कार्यक्रमाला सुमारे सात लाख शिवप्रेमी उपस्थित राहणार असल्याचा दावा जेएनपीटीने मंगळवारी पत्रकार परिषदेत केला.जेएनपीटीने उरण तालुक्यातील जासई-दास्तानफाटा दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थांच्या भेटीवर आधारित शिवस्मारक उभारण्याचे काम गतवर्षी सुरू केले आहे. सुमारे ३० कोटी खर्चून २२ मीटर उंचीचे हे स्मारक जेएनपीटीच्या मालकीच्या पावणेदोन एकर जागेत उभारण्यात येत आहे. स्मारकाच्या पुतळ्याचे काम थोर शिल्पकार दीपक थोपटे यांनी केले आहे. परिसरात आर्ट गॅलरी, शिवकालीन वस्तूंचे म्युझियम, मिनी एम्पी थिएटर, कॅफेटरिया, फाउंटन गार्डन आदी सुविधा उभारण्यात येत आहेत. स्मारकाचे काम अपूर्णच असतानाच जेएनपीटीने अपूर्ण अवस्थेतील शिवस्मारकाच्या उद्घाटनाचा घाट घातला आहे. जेएनपीटीने चालविलेल्या उद्घाटनाच्या घाईला अनेक राजकीय, सामाजिक संघटनांंनी विरोध केला आहे. मंगळवारी पत्रकार परिषदेत जेएनपीटी ट्रस्टी महेश बालदी, कामगार ट्रस्टी दिनेश पाटील, रवींद्र पाटील, मुख्य प्रबंधक जयवंत ढवळे, एन. के. कुलकर्णी उपस्थित होते.
उरणमधील शिवस्मारकाचे उद्घाटन; सात लाख शिवप्रेमी उपस्थित राहणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 12, 2019 11:53 PM