नांदगाव/ मुरुड : राजपुरी येथील जंजिरा किल्ल्यावर पर्यटकांना ने-आण करण्याचे काम जंजिरा पर्यटक सोसायटी करीत होती; परंतु राजपुरी गावात राहणारे जावेद कारबारी यांनी वेलकम सोसायटी स्थापन करून राजपुरी नवीन जेट्टी येथून महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून मान्यता मिळवून येथून पर्यटकांना सेवा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला. यामुळे या दोन संघटनांमध्ये वाद निर्माण होऊन येथे तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. यावर उपाय म्हणून अखेर महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाचे मुरु ड येथील बंदर निरीक्षक अतुल धोत्रे यांनी १ डिसेंबरपासून जंजिरा किल्ल्यावरील सेवा बंद ठेवण्याचा लेखी आदेश दिल्याने असंख्य पर्यटकांना जंजिरा किल्ला न पाहताच परतावे लागणार आहे.
राजपुरी येथून जंजिरा किल्ल्यावर गेल्या कित्येक वर्षांपासून जंजिरा पर्यटक सोसायटी काम करीत आहे; परंतु महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डाकडून वेलकम सोसायटीलासुद्धा परवानगी दिल्याने धंद्यावर परिणाम होऊन बेकारी वाढेल, असे कारण पुढे करून वेलकम सोसायटीने येथून प्रवासी वाहतूक करण्यास मनाई केली. याबाबत येथील काही लोकांचा धक्काबुकी, तसेच किरकोळ वाद सतत सुरू होता. तहसीलदार व मुरु ड पोलीस ठाणे यांनीसुद्धा या दोन संघटनांना समजावण्याचा प्रयत्न केला; परंतु हा वाद काही न मिटल्याने अखेर मुरु ड बंदर निरीक्षक अतुल धोत्रे यांनी १ डिसेंबरपासून सर्व सेवा बंद करण्याचा लेखी आदेश दिल्याने पर्यटकांना हा किल्ला आता पाहता येणार नाही. जंजिरा पर्यटक सोसायटी ही आपल्या व्यतिरिक्त इतरांना धंदा करू देत नसल्याने हा वाद चिघळला आहे. वेलकम सोसायटी हीसुद्धा स्थानिक लोकांची असून, त्यांनी धंदा केल्यास आपणावर बेकारी वाढेल, असे कारण देत वाद वाढवला आहे. या दोन संघटनांच्या वादामुळे पर्यटकांना जंजिरा किल्ल्यावर जाता येणार नाही. शुक्र वारपासून सगल तीन दिवस सुट्टी आल्याने हा किल्ला पाहण्यासाठी हजारो पर्यटक येणार आहेत; परंतु त्यांची निराशा होणार हे स्पष्ट आहे.जंजिरा किल्ल्यावर वाहतूक करण्यासाठी दोन संस्थांना जलवाहतुकीचा परवाना मिळाला होता; परंतु येथे पूर्वापार जलवाहतूक करणारी जंजिरा पर्यटक सोसायटी यांनी हरकत घेतल्याने या दोघांमध्ये समझोता होत नव्हता. इंजिन बोटीला परवानगी दिल्याने आमचा व्यवसाय घटेल, असा त्यांचा दावा होता. याबाबत मुरु ड तहसीलदार, मुरु ड पोलीस ठाण्याकडेसुद्धा बैठक होऊनसुद्धा तोडगा निघत नाही. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न लक्षात घेऊन ही जलवाहतूक बंद केली आहे. याबाबत आता जिल्हाधिकाºयांनी पुढील निर्णय घेतल्यावरच बोटी सुरू होतील.- अतुल धोत्रे, बंदर निरीक्षक,महाराष्ट्र मेरीटाइम बोर्डमोठ्या उत्सुकतेने आम्ही किल्ला पाहावयास आलो होतो; परंतु वाहतूक बंद असल्याने आमची घोर निराशा झाली आहे. शासनाने याकडे लक्ष देऊन येथील वाद मिटवावा, त्यामुळे आम्हा पर्यटकांचे हाल होत आहेत.- प्रणव गायकवाड, पर्यटक, नागपूर