कावीळ आणि तापाची साथ

By admin | Published: February 9, 2016 02:27 AM2016-02-09T02:27:13+5:302016-02-09T02:27:13+5:30

दासगावमध्ये गेली काही दिवसांपासून तापाच्या साथीबरोबरच आता काविळीची साथ देखील उद्भवली आहे. गावांमध्ये सद्यस्थितीत काविळीचे जवळपास १० रुग्ण आढळून आले आहेत.

With jaundice and copper | कावीळ आणि तापाची साथ

कावीळ आणि तापाची साथ

Next

दासगाव : दासगावमध्ये गेली काही दिवसांपासून तापाच्या साथीबरोबरच आता काविळीची साथ देखील उद्भवली आहे. गावांमध्ये सद्यस्थितीत काविळीचे जवळपास १० रुग्ण आढळून आले आहेत. यातील सर्व रुग्ण खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून या साथीबाबत दासगाव ग्रामपंचायत आणि आरोग्य केंद्र देखील अनभिज्ञ आहे. विशेष म्हणजे लागण झालेले सर्व रुग्ण ही लहान मुले आहेत.
पाणीपुरवठा योजनेचे बिल अदा न केल्याने महावितरणने दासगाव ग्रामपंचायतीची वीज जोडणी तोडली आहे. यामुळे गावात पाण्याची बोंब आहे. गावातील बोअरवेलचा आधार ग्रामस्थांनी घेतला आहे. खाजगी स्रोतामधून वापरलेल्या पाण्याने दासगाव मोहल्ला परिसरात काविळीची साथ उद्भवली आहे. मोहल्ल्यातील जवळपास दहा जणांना कावीळ झाल्याचे खाजगी रुग्णालयात केलेल्या तपासणीत निष्पन्न झाले आहे. दासगावमधील प्राथमिक आरोग्य केंद्रात मात्र एकाही रुग्णाने उपचार करुन घेतले नसल्याने येथील आरोग्य केंद्राला या काविळीची माहिती मिळाली नाही. गावचे उपसरपंच परवेझ अनवारे यांचा ७ वर्षाचा मुलगा यासर देखील काविळीची लागण झाली आहे.
गावातील या साथीबाबत अद्याप येथील ग्रामपंचायतीने देखील कोणतीच कारवाई केलेली नाही. गावात तापाची आणि काविळीची साथ असल्याचे ग्रामपंचायतीला आणि दासगाव प्राथमिक रुग्णालयाला देखील माहिती नाही. गावातील पिण्याच्या पाण्याचे स्रोत दूषित झाले असले तरी कावीळ आणि तापाचे रुग्ण गावात जाणवू लागल्यानंतर देखील पिण्याच्या पाण्याचे स्रोत ग्रामपंचायतीने साफ केलेले नाहीत. काविळीचे रुग्ण १ ते १५ या वयोगटातील असल्याने येथील पिण्याचे पाणी तपासून त्वरित उपाययोजना करणे गरजेचे आहे.
माझ्या मुलगा यासर यालाही कावीळची लागण झाली आहे. महाडमधील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. दासगावच्या पाणीपुरवठा योजनेत अगर विहिरीच्या पाण्यात काहीतर गडबड आहे, असे दासगावचे उपसरपंच परवेज अनवारे यांनी सांगितले. (वार्ताहर)

दासगावमधील एकाही रुग्णाने प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार घेतलेले नाहीत किंवा ग्रामस्थांनी या केंद्राला कळवलेले नाही. गावातील विहिरी आणि पिण्याच्या पाण्याचे स्रोत तपासले असून, याचे रिपोर्ट साधारण आहेत. ग्रामस्थांच्या खासगी बोअरवेल किंवा अन्यत्र पाणी पिण्याने कावीळ झाली असावी.
- डॉ. सुधीर घोडके, प्राथमिक आरोग्य केंद्र, दासगाव

Web Title: With jaundice and copper

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.