वडखळ : मुंबई-गोवा महामार्गाची दुरवस्था झाली असून, पडलेले खड्डे तसेच खोदून ठेवलेला रस्ता यामुळे हा महामार्ग मृत्यूचा सापळा बनला आहे. चौपदरीकरणाचे काम सुरू होऊन आज आठ वर्षे झाली तरी देखील अद्याप ५० टक्के काम पूर्ण झालेले नाही. शासनाचे लक्ष वेधण्यासाठी रायगडसह कोकणातील पत्रकार रायगड प्रेस क्लबचे संस्थापक एस. एम. देशमुख व कोकण मराठी परिषदेचे किरण नाईक यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी महामार्गावर वडखळ नाक्यावर मानवी साखळी व पोस्टर आंदोलन करणार आहेत.मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण व्हावे यासाठी गेली नऊ वर्षे रायगड व कोकणातील पत्रकार विविध आंदोलनाद्वारे शांततेच्या मार्गाने लढत आहेत. पत्रकारांनी केलेल्या आंदोलनाची दखल घेत या महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू झाले. सुरु वातीला हे काम युध्दपातळीवर सुरू होते, परंतु गेल्या दोन वर्षांपासून हे काम अत्यंत धीम्या गतीने सुरू आहे. रखडलेल्या व जागोजागी खोदून ठेवलेल्या रस्त्यांमुळे तसेच पडलेल्या खड्ड्यांमुळे या महामार्गावरून प्रवास करणे म्हणजे एक दिव्य बनले आहे. पळस्पा ते झाराप, कशेडी घाटापर्यंत रोज कुठे ना कुठे अपघात होत असून त्यात निष्पाप लोकांचे बळी जात आहेत, परंतु त्याकडे राज्य व केंद्र शासन पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहेत.सरकारला जागे करण्यासाठी पुन्हा एकदा सामाजिक जाणिवेतून पत्रकार रस्त्यावर उतरणार असून सोबत विविध संस्था, वाहनचालक संघटना या देखील या आंदोलनात सहभागी होणार आहेत. तरी सर्व पत्रकार व जनतेने या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष विजय मोकल, कार्याध्यक्ष भारत रांजणकर, उपाध्यक्ष राजेंद्र जाधव, धर्मानंद गायकवाड यांनी केले आहे.
पत्रकार उतरणार रस्त्यावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 05, 2017 2:21 AM