अलिबाग : माघ पौर्णिमेनिमित्त वरसोली येथे मंगळवारी रात्री उशिरा खंडोबाचा पालखी सोहळा पार पडला. यातील विशेष बाब म्हणजे वरसोली कोळी समाज आणि खंडोबा देवस्थान ट्रस्ट यांच्यामध्ये गेल्या काही वर्षांपासून खंडोबा मंदिर भ्रष्टाचार प्रकरणी वाद सुरू आहेत. कोळी समाजाने पालखी काढण्याची वर्षानुवर्षाची परंपरा आहे. परंतु कोळी समाज आणि खंडोबा देवस्थान ट्रस्टने दोन वेगवेगळ््या पालख्या काढल्याने ही परंपरा तब्बल ४० वर्षांनी पुन्हा एकदा खंडित झाली.
कोळी समाजाने काढलेल्या पालखी सोहळ््याला ग्रामस्थांनी प्रचंड गर्दी करत यळकोट यळकोट जय मल्हार अशा गगनभेदी घोषणांनी परिसर दणाणून सोडला.वरसोली गावामध्ये कोळी समाजाची मोठ्या संख्येने वस्ती आहे. खंडोबा हे कोळी समाजाचे आराध्य दैवत आहे. खंडोबाचे सर्वच उत्सव मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची अनेक वर्षांची परंपरा येथील कोळी समाजाने आजही तितकीच मनोभावे जपली आहे. माघ पौर्णिमा असल्याने या दिवशी खंडोबाची पालखी काढण्याची परंपरा आहे. कोळी समाजाने पालखी काढण्याची तयारी केली होती, परंतु खंडोबा देवस्थान ट्रस्टनेही पालखी काढण्याचे ठरवले होते. गेल्या वर्षी ट्रस्ट आणि कोळी समाज यांच्यामध्ये पालखी काढण्यावरुन एकमत होत नव्हते. त्यावेळी एका राजकीय पक्षाच्या प्रमुखांनी दोघांमध्ये समन्वय साधत पालखी काढण्याचा मान ट्रस्टींना दिला होता. मात्र ट्रस्टींवर खंडोबा मंदिर बांधून पूर्ण करण्याची दिलेली जबाबदारी गेल्या सहा वर्षात पूर्ण केलेली नाही. त्यामुळे कोळी समाजामध्ये चांगलीच खदखद आहे, असे कोळी समाजाचे अध्यक्ष गणेश आवारी यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.मंगळवारी साजरा होणाऱ्या पालखी सोहळ््याचा मान समाजानेच घेण्याचे ठरवले. त्यानुसार त्यांनी तयारी सुरु केली. त्यानंतर ट्रस्टनेही मागे न हटता पालखी काढण्याचे ठरवले होते. वरसोलीचे सरपंच मिलिंद कवळे आणि अलिबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक दशरथ पाटील यांनी कोळी समाज आणि ट्रस्टी यांच्यामध्ये समझोता घडवण्याचा प्रयत्न केला, मात्र दोघे आपापल्या मतांवर ठाम राहिले. त्यामुळे गावातून दोन पालख्या काढण्यात आल्याचे सरपंच मिलिंद कवळे यांनी स्पष्ट केले. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवूनच पालख्यांना हिरवा कंदील देण्यात आला होता. त्यामुळे वरसोली गावामध्ये चोख पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. त्यामुळे वरसोली गावाला पोलीस छावनीचे स्वरूप आले होते.च्पालखी काढण्यासाठी आधी ट्रस्टला सांगण्यात आले. त्यानुसार ट्रस्टने शांततेने पालखी काढली. त्यानंतर कोळी समाजाने सायंकाळी पालखी उत्सवाला सुरुवात केली. खंडोबाची पालखीतून वाजतगाजत मिरवणूक काढून भंडारा उधळण्यात आला. त्यावेळी अख्खा गाव या आनंदी सोहळ््यात तल्लीन झाल्याचे दिसून आले. आबालवृध्दांसह महिलांनी संगीताच्या तालावर ठेका धरला. महिलांनी पारंपरिक वेश परिधान केल्याने त्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत होत्या. कोळी समाजानेही कायद्याचे पालन करत पालखी उत्सव शांततेत पार पाडला.