म्हसळा : गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशी डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानने म्हसळा तालुक्यात पाच टनापेक्षा अधिक निर्माल्य संकलन केले आहे. या निर्माल्यातून सेंद्रिय खतनिर्मिती करण्यात येणार आहे. प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी तसेच सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमाचे नियोजन करण्यात आले. या निर्माल्यासाठी म्हसळा तालुक्यातील खेडेगाव-वस्तीमध्येही प्रतिष्ठानच्या सदस्याने निर्माल्य संकलन केले आहे.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानच्या आदर्श उपक्रमामुळे गणेश उत्सवात वाहण्यात आलेली फुले, दूर्वा, हार हे दरवर्षी पाण्यामध्ये विसर्जित केले जात होते; परंतु प्रतिष्ठानच्या उपक्रमांतर्गत वाया जाणारी हार, फुले आज वृक्षाच्या खतासाठी उपयुक्त ठरणार आहेत. प्रतिष्ठानने अशा प्रकारचे समाजोपयोगी उपक्रम राबवत संपूर्ण मानवतेला एक निसर्गनिष्ठा काय असते याचे प्रत्यक्षदर्शी साक्ष दिले आहे.म्हसळा तालुक्यात दोन पाणपोई, बस थांबे, पाझर तलावातील गाळउपसा, रस्त्याच्या दुतर्फा वृक्षारोपण तसेच २५०० पेक्षा विविध धर्म-जातीचे दाखले वाटप, शहरासह तालुक्यात स्वच्छता मोहीम असे विविध उपक्रम राबवत तालुक्यात कार्य केले आहे. त्यामुळे आजच्या या निर्माल्य संकलन उपक्रमामुळे तालुक्यात डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे सर्वस्तरातून विशेष कौतुक होत आहे.
आमच्या म्हसळा तालुक्यामध्ये डॉ. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानचे अध्यक्ष डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनी प्रतिष्ठान मार्फत गणेश चतुर्थीच्या काळात गणेशाला वाहण्यात आलेली फुले, दूर्वा, हार हे वाया जाण्याऐवजी आज त्यांचे कुंडींमध्ये नियोजन करून संकलन केले होते, त्यामुळे या पर्यावरण संरक्षणाकरिता निर्माल्याचा उपयोग सेंद्रिय खतामध्ये होणार असल्याने आम्हाला आज या उपक्रमाचा मनस्वी आनंद होत आहे. त्यामुळे प्रतिष्ठानचे कौतुक करावे तेवढे कमीच आहे. - गौरव पोतदार, गणेशभक्त