नागोठणे ग्रामपंचायत निवडणूक : शिवसेना-काँग्रेस आघाडीची पुन्हा सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2018 02:31 AM2018-03-01T02:31:54+5:302018-03-01T02:31:54+5:30
येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी रोहा येथील तहसील कार्यालयात पार पडून सरपंचपदाचे शिवसेना-काँग्रेस आघाडीचे उमेदवार
नागोठणे : येथील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी रोहा येथील तहसील कार्यालयात पार पडून सरपंचपदाचे शिवसेना-काँग्रेस आघाडीचे उमेदवार विद्यमान ग्रा. पं. सदस्य मिलिंद धात्रक यांनी राष्ट्रवादी-शेकाप आघाडीचे लक्ष्मण टके यांचा ३२१ मतांनी पराभव करीत विजय प्राप्त केला. माजी सरपंच, भाजपा पुरस्कृत आघाडीचे विलास चौलकर यांना पराभव स्वीकारावा लागला. या निवडणुकीत सेना काँग्रेस आघाडीने १७ पैकी ११ जागांवर विजय मिळवत उपसरपंचपद आपल्याकडेच ठेवल्याचे स्पष्ट होत असून, गत निवडणुकीच्या तुलनेत राष्ट्रवादीने आणखी ४ जागा जिंकत या वेळी ६ सदस्य निवडून आणले आहेत.
या निवडणुकीत प्रभाग क्र मांक २च्या सेनेच्या पूनम इप्ते आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार मेघा कोळी यांना समसमान मते पडल्याने चिठ्ठी उडविण्यात येऊन त्यात कोळी यांचे नाव आल्याने त्या विजयी झाल्याचे घोषित केले. या निवडणुकीत विद्यमान उपसरपंच शैलेंद्र देशपांडे यांनी २७ मतांनी निसटता विजय मिळवला असला, तरी सलग पाचव्यांदा निवडणूक जिंकण्याची त्यांनी किमया साधली आहे. इतर विद्यमान ७ सदस्यांपैकी प्रकाश मोरे वगळता सुरेश जैन, अकलाख पानसरे, दिलनवाज अधिकारी, मोहन नागोठणेकर, रंजना राऊत आणि सुप्रिया महाडिक हे उमेदवार पुन्हा विजयी झाले. इतर १० सदस्य पहिल्यांदाच सदस्य म्हणून निवडून आले आहेत. या निवडणुकीत पक्ष बाजूला ठेऊन काही तथाकथित नेते इतर पक्षातील सदस्यांना निवडून आणण्यासाठी मते मागत असल्याचे त्या निमित्ताने उघड झाले आहे.
वारळवर युतीचा झेंडा-
लोकमत न्यूज नेटवर्क
म्हसळा : तालुक्यातील वारळ ग्रामपंचायतीवर शिवसेना-काँग्रेस युतीचा झेंडा फडकला असून, सात पैकी पाच उमेदवार युतीचे तर राष्ट्रवादीचे दोन उमेदवार विजयी झाले आहेत. सरपंचपदाच्या शर्यतीतही सेना-काँग्रेस युतीचाच उमेदवार विजयी झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सुपडा साफ झाल्याचे चित्र स्पष्ट
झाले आहे. भारतीय जनता पार्टीला आपला खातेदेखील उघडता आले नाही.
वारळ ग्रामपंचायतीमध्ये प्रभाग क्र.३च्या निवडणुकांमध्ये एक वेगळेच चित्र पाहायला मिळाले असून, या प्रभागात विजयी उमेदवाराला १४० तर नोटाला १३३ मतदान पडल्याने सर्व नागरिकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. सरपंचपदाच्या शर्यतीत युतीचे रमेश खोत विजयी झाले आहेत.