नेरळ रस्त्यांचा वाद उफाळला, आयुक्तांकडे तक्रारीची मागणी, नेरळ संघर्ष समितीकडे लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2017 02:21 AM2017-12-03T02:21:05+5:302017-12-03T02:21:14+5:30
नेरळमध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून होत असलेल्या रस्त्यांची कामे ही निकृष्ट व सदोष असल्याने या रस्त्यांच्या कामाची चौकशी व्हावी व रस्ता एमएमआरडीएने ताब्यात घेऊन करावा, अशी मागणी नागरिकांनी संघर्ष समितीच्या बैठकीत केली आहे.
नेरळ : नेरळमध्ये एमएमआरडीएच्या माध्यमातून होत असलेल्या रस्त्यांची कामे ही निकृष्ट व सदोष असल्याने या रस्त्यांच्या कामाची चौकशी व्हावी व रस्ता एमएमआरडीएने ताब्यात घेऊन करावा, अशी मागणी नागरिकांनी संघर्ष समितीच्या बैठकीत केली आहे. त्यामुळे केवळ रस्त्यांचा मुद्दा घेऊन तयार झालेली नेरळ संघर्ष समिती नेरळकरांना साथ देणार की पाठ दाखवणार, याकडे नेरळकरांचे लक्ष लागले आहे.
नेरळ संघर्ष समितीचे अध्यक्ष व सदस्य यांच्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांची कामे होऊनही बहुतांश निकृष्ट असल्याचे जिल्हा परिषदेच्या बांधकाम खात्याने मान्य केले. त्यामुळे संघर्ष समितीच्या बैठकीत एमएमआरडीएच्या माध्यामातून होत असलेल्या रस्त्यांच्या कामाची चौकशी व्हावी व रस्ता एमएमआरडीएने ताब्यात घेऊन स्वत: करावा, अशी नागरिकांच्या वतीने मागणी करण्यात आली. त्याला समितीने होकार दिला. परंतु अनेक प्रश्नांना बगल देऊन संपन्न झालेल्या बैठकीला संघर्ष समितीचे अध्यक्ष व सदस्य एमएमआरडीए व संबंधित विभागांकडे तक्रार व पाठपुरावा करणार का? नेरळकरांनी केलेल्या मागणीला संघर्ष समिती साथ देणार की पाठ दाखवणार? याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
या वेळी समिती अध्यक्ष रामचंद्र मोरे, नारायण सुर्वे, माधवराव गायकवाड, संजय जाधव, तंटामुक्त समिती अध्यक्ष संतोष मोरे आदी मान्यवर उपस्थित होते.
नेरळ संघर्ष समितीची बैठक गेल्या महिन्यात नेरळ येथील साने सभागृहात घेण्यात आली. नेरळमध्ये रस्त्यांची कामे होत असताना त्यात अनेक दोष आहेत. हे दोष दुरूस्त करण्यासाठी नागरिकांनी एकत्र येण्याची गरज निर्माण होऊन नेरळ संघर्ष समिती सुरू झाली.