अविश्वास सभेला सत्ताधारी राहणार गैरहजर
By admin | Published: March 16, 2016 08:36 AM2016-03-16T08:36:15+5:302016-03-16T08:36:15+5:30
रायगड जिल्हा परिषदेतील सत्ताधारी सदस्यांनीच अध्यक्षांसह चारही सभापतींवर अविश्वास ठाराव दाखल केल्यानंतर बहुतांश सत्ताधारी सदस्य गोव्याला फिरायला गेले आहेत.
- आविष्कार देसाई, अलिबाग
रायगड जिल्हा परिषदेतील सत्ताधारी सदस्यांनीच अध्यक्षांसह चारही सभापतींवर अविश्वास ठाराव दाखल केल्यानंतर बहुतांश सत्ताधारी सदस्य गोव्याला फिरायला गेले आहेत. अविश्वास ठराव सिद्ध करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी २३ मार्चला विशेष सभेचे आयोजन केले आहे. त्याच दिवशी दुपारी अर्थसंकल्पाची सभा बोलविण्यात आली आहे. त्यामुळे सत्ताधारी सदस्य अविश्वास सभेला गैरहजर तर अर्थसंकल्पाच्या सभेला हजर राहणार आहेत.
पुढील सात दिवस सत्ताधारी गोव्यातील पर्यटनाचा आनंद लुटणार आहेत. त्यामुळे याच कालावधीत जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आपापल्या विविध कामांसाठी येणाऱ्या जनतेला सत्ताधारी सापडणार नाहीत. त्यांच्या पदरी निराशा पडणार आहे. शेकाप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांची सत्ता असलेल्या जिल्हा परिषदेवर शिवसेनेला सत्ता स्थापन करायची आहे. यासाठी त्यांनी सत्ताधारी पक्षातील नाराज सदस्यांना एकत्र करण्याच्या हालचाली तीव्र केल्या होत्या. सत्ताधाऱ्यांवर अविश्वास ठराव आणण्यासाठीही त्यांनी शर्तीचे प्रयत्न सुरू केले होते. सत्ताधाऱ्यांनी विरोधकांच्या राजकीय व्यूहरचनेचा धसका घेतला होता. विरोधकांची व्यूहरचना भेदण्यासाठी सत्ताधाऱ्यांनीच स्वत:वरच अविश्वास ठराव आणण्याची खेळी करून विरोधकांना चांगलीच चपराक दिली होती.
२३ मार्चला विशेष सभा बोलवण्यात आली असल्याने या कालावधीत कोणतेही राजकीय बदल होऊ शकतात, हे गृहीत धरून सत्ताधाऱ्यांनी नाराज सदस्यांना एकत्र करून दोन दिवसांपूर्वीच थेट गोवा गाठले आहे. सत्ताधारी सदस्यांमधील कोणत्याही सदस्याला पळविण्यात येऊ शकते. यासाठी सुमारे २५ सदस्य हे गोव्याला गेले आहेत. तेथे त्यांची पंचतारांकित हॉटेलमध्ये चांगलीच बडदास्त ठेवली जात असल्याचे एका सदस्याने सांगितले.
सर्व सदस्य २२ मार्चपर्यंत गोव्यातील पर्यटनाचा आनंद लुटणार आहेत. पार्टी, मौजमजा यामध्ये आपला वेळ घालविणार आहेत. २३ मार्चला सर्व सदस्य एकत्रितरीत्या जिल्हा परिषदेमध्ये अर्थसंकल्पासाठी हजर राहतील. मात्र त्याच दिवशी सकाळी ११ वाजता होणाऱ्या अविश्वास ठरावाच्या विशेष सभेला गैरहजर राहणार असल्याचे एका सदस्याने सांगितले. २०१६-१७ चा अर्थसंकल्प हा १०० कोटींपर्यंत पोचणार असल्याचे बोलले जाते.