‘नोटाबंदी’ मोठ्या प्रक्रियेची सुरुवात - बोकील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2017 12:26 AM2017-12-04T00:26:40+5:302017-12-04T00:26:45+5:30
भारतात गेल्या वर्षी झालेल्या नोटाबंदीने जरी सामान्य लोकांना धक्का बसला असला तरी यामधून एका मोठ्या प्रक्रियेची सुरुवात होत आहे, असे मत अर्थतज्ज्ञ अनिल बोकील
मुंबई : भारतात गेल्या वर्षी झालेल्या नोटाबंदीने जरी सामान्य लोकांना धक्का बसला असला तरी यामधून एका मोठ्या प्रक्रियेची सुरुवात होत आहे, असे मत अर्थतज्ज्ञ अनिल बोकील यांनी व्यक्त केले. बाजारातील पैसा हा सार्वजनिक होण्यासाठीसुद्धा नोटाबंदी गरजेची होती, असेही ते म्हणाले.
विद्यार्थी उत्कर्ष मंडळाने लालबाग येथे आयोजित केलेल्या हीरकमहोत्सवी विवेकानंद व्याख्यानमालेत ‘अर्थव्यवस्थेसमोरील आव्हाने आणि सामान्य माणूस’ या विषयावर नुकतेच अनिल बोकील बोलत होते. नोटाबंदीची प्रमुख चार कारणे आहेत.
निसर्गाशी तुटलेले अर्थशास्त्र, पैसा हे विनिमयाचे माध्यम, चलनात असलेल्या मोठ्या किमतीच्या नोटा त्यामुळे भ्रष्टाचाराला वाव आणि मानसिकतेबरोबर चुकीची अर्थव्यवस्था होय. भविष्यात डिजिटल अर्थव्यवस्था असणार असून
त्यासाठी तरुणांनी पुढे यायला हवे, असे आवाहन अनिल बोकील यांनी केले.
भारताकडे शाश्वत तत्त्वज्ञान असल्याने जगाच्या अर्थव्यवस्थेमध्ये भारताची भूमिका महत्त्वाची आहे. जगण्यापुरते असलेले अर्थशास्त्र सर्वांना माहीत आहे. अर्थशास्त्र हे पैशाचे शास्त्र नसून संसाधनाचे शास्त्र आहे. तसेच पैसा ही सार्वजनिक मालमत्ता असल्याने तो शरीरातील रक्तासारखा चलनात फिरता राहिला पाहिजे, असे बोकील म्हणाले.
अर्थक्रांतीची मांडणी करताना त्यांनी भारताचा जागतिक आनंद अंकामधील रँक वाढविण्यासाठी सध्याच्या ८ तासांच्या नोकरीऐवजी ६ तासांच्या दोन शिफ्टमध्ये काम करावे. त्यामुळे नोकरीतील ताणतणाव कमी होतील तसेच तरुणांना नोकरीच्या संधी उपलब्ध होतील आणि बेरोजगारी काही प्रमाणात कमी होण्यास मदत होईल, असेही बोकील म्हणाले.