उरण : जेएनपीटीच्या ५०० हेक्टरमध्ये रिलायन्स, जीबीएल, आयएमसी, इंडियन आइल, आयओटीएल, विराज अग्रो आदी मोठमोठे रासायनिक प्रकल्प उभारण्यात आले आहेत. यामधून मोठ्या प्रमाणात घातक, धोकादायक, ज्वलनशील आणि विषारी पदार्थ, वायू, रसायनांची हाताळणी केली जाते. तसेच उरण परिसरात ओएनजीसी, बीपीसीएल, जीटीपीएस आदी प्रकल्पांचाही यात समावेश आहे. रासायनिक प्रकल्पात वारंवार आग, स्फोटाच्या घटना घडत असून त्या आटोक्यात आणण्यासाठी कंपन्यांकडे अद्ययावत, स्वयंचलित यंत्रणा उपलब्ध असल्याचा दावा वारंवार केला जातो. मात्र, जेव्हा दुर्घटना घडते, त्या वेळी कंपन्यांचे सर्वच दावे फोल ठरतात. यामुळे हे रासायनिक प्रकल्प उरणकरांसाठी धोकादायक ठरत आहेत.
ओएनजीसीच्या प्रकल्पात मंगळवारी पहाटे लागलेल्या भीषण आगीच्या घटनेने उरण ज्वालामुखीच्या तोंडावर असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे.उरण परिसरात प्रकल्पांची रासायनिक पदार्थ साठविण्याची क्षमता प्रचंड आहे. या रासायनिक प्रकल्पात आग, स्फोटासारखी मोठी दुर्घटना घडल्यास रासायनिक प्रकल्पाच्या ३० कि.मी. परिघातील परिसर बेचिराख होण्याचा धोका आहे. त्यामुळे ज्वालामुखीच्या तोंडावर उरण असल्याची भीती नेहमीच व्यक्त केली जाते.
रासायनिक प्रकल्पात वारंवार घडणाऱ्या घटनांमुळे उरणकरांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. आग आटोक्यात आली नसती तर ओएनजीसी प्रकल्पाशेजारीच असलेली अनेक गावे आणि लाखो रहिवाशांवर ऐन गणेशोत्सवातच गंडातर आले असते.
ओएनजीसीतील आगीच्या कारणमीमांसेसाठी बैठकउरण : ओएनजीसी प्रकल्पात मंगळवारी लागलेली आग आणि त्यामुळे उरणकरांची सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून निर्माण झालेल्या गंभीर समस्यांबाबत कारणमीमांसेवर चर्चा करण्यासाठी तालुक्यातील नागरिकांच्या महत्त्वाच्या बैठकीचे रविवारी आयोजन करण्यात आले आहे. सकाळी १० वाजता आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके सभागृह तेलीपाडा -उरण येथे आयोजित बैठकीत नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन उरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष सुधाकर पाटील, सरचिटणीस संतोष पवार यांनी केले आहे. उरण शहराच्या वेशीवर असलेल्या ओएनजीसी प्रकल्पात नाफ्ता या ज्वालाग्राही वायूची गळती झाली आणि वातावरणात पसरलेल्या नाफ्त्याने पेट घेतला. सुदैवाने ती आग नियंत्रणात आणली गेली; परंतु त्या प्रयत्नात चार कर्मचाऱ्यांना जीव गमवावा लागला.