लोकमत न्यूज नेटवर्क पाली : पाली तहसील कार्यालयात सुधागड तालुक्यातील सर्व पोल्ट्री चालक व मालक यांची महत्त्वपूर्ण बैठक गुरुवारी संपन्न झाली. यावेळी तालुका पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. प्रशांत कोकरे यांनी बर्ड फ्लू व त्यासंदर्भात घेण्यात येणाऱ्या उपाययोजनांची शास्त्रोक्त माहिती दिली. खबरदारी व उपाययोजना करण्याचे आवाहन बर्ड फ्ल्यूच्या पार्श्वभूमीवर केले.पोल्ट्री व्यवसाय उद्ध्वस्त होण्यापासून वाचवा, व्यावसायिकांना यासंदर्भात शास्त्रोक्त माहिती व उपाययोजना कळाव्यात आणि त्यांचे प्रबोधन व्हावे या उद्देशाने या बैठकीचे आयोजन तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी केले होते.जिल्हा व तालुका प्रशासन, पशुसंवर्धन विभाग आणि आरोग्य विभागाच्या वतीने याबाबत योग्य उपाययोजना करण्यात येत असल्याची माहिती यावेळी तहसीलदार दिलीप रायन्नावार यांनी दिली. तसेच काही दिवसांत तालुक्यातील चिकन विक्रेत्यांची देखील अशाच स्वरूपाची बैठक आयोजित करणार असल्याचे रायन्नावार यांनी सांगितले. यावेळी तालुका पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रशांत कोकरे यांनी नागरिकांनी सतर्कता बाळगली पाहिजे. पोल्ट्री व्यवसायाला बर्ड फ्लूचा जास्त धोका नाही. मात्र, तरीही पोल्ट्री व्यावसायिकांनी व तेथे काम करणाऱ्यांनी हातात ग्लोव्हज न घालता मृत पक्ष्यांना स्पर्श करणे टाळा. हात वारंवार धुतले पाहिजेत. वैयक्तिक स्वच्छतेची काळजी घेणे. पोल्ट्री शेडवर बाहेरील गाडी किंवा माणसे येण्यास मनाई करावी, असे सांगितले.
आपल्या सभोवतालची स्वच्छता राखणे महत्त्वाचे आहे. कुक्कुटपालकांनी शेड व परिसर सोडिअम हायपोक्लोराइड, चुना लावून निर्जंतुकीकरण करून जैवसुरक्षा नियमांची अंमलबजावणी करावी. अतिरिक्त खबरदारीसाठी, कोंबडी किंवा कोंबडीशी संबंधित इतर उत्पादने हाताळताना चेहऱ्यावर मास्क आणि ग्लोव्हज वापरण्याची सवय लावा. पशुसंवर्धन विभागाकडून योग्य उपाययोजना व तरतुदी करण्यात आल्या आहेत, असे कोकरे म्हणाले. बैठकीस तालुक्यातील सर्व पोल्ट्री व्यावसायिक उपस्थित होते.