रायगडला म्युकरमायकोसिसचे रुग्ण नाहीत; स्टेरॉइड्स, टोसिलिझुमॅब इंजेक्शनचे परिणाम टाळण्याचे प्रयत्न यशस्वी
By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2021 08:25 AM2021-05-11T08:25:19+5:302021-05-11T08:29:01+5:30
विशेषतः मधुमेह असलेल्या रुग्णांना तो होत असून, त्यामुळे अनेकांना डोळे गमविण्याची वेळ आली आहे. रुग्णाचे केवळ डोळेच नव्हे, तर मूत्रपिंड आणि मेंदूवरही या आजारामुळे आघात होऊ शकतो.
निखिल म्हात्रे -
अलिबाग : कोरोनासारख्या जीवघेण्या आजारातून वाचविण्यासाठी देण्यात येणारे स्टेरॉइड्स आणि अन्य टोसिलिझुमॅब इंजेक्शनचे आता प्रतिकूल परिणाम दिसत असून, म्युकरमायकोसिस हा बुरशीसारखा आजार होत असल्याच्या अनेक तक्रारी आहेत. मात्र, रायगड जिल्ह्यात आतापर्यंत एकाही रुग्णाला या आजाराची लागण झाली नसल्याने डाॅक्टरांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
विशेषतः मधुमेह असलेल्या रुग्णांना तो होत असून, त्यामुळे अनेकांना डोळे गमविण्याची वेळ आली आहे. रुग्णाचे केवळ डोळेच नव्हे, तर मूत्रपिंड आणि मेंदूवरही या आजारामुळे आघात होऊ शकतो. फेब्रुवारीपासून कोरोनाचा संसर्ग वाढण्यास सुरुवात झाली. दुसरी लाट इतकी भयंकर आहे की, अनेक रुग्णांना ऑक्सिजनचीही गरज भासत आहे.
कोरोना रुग्णांची गंभीर अवस्था असेल, तर त्यांना वाचविण्यासाठी उपचार करणारे डॉक्टर्स स्टेरॉइड्स आणि अन्य टोसिलिझुमॅब इंजेक्शनचा वापर करतात. त्यानंतर, हे रुग्ण बरे होत असले, तरी नंतर मात्र, अशा औषधांच्या माऱ्याचा प्रतिकूल परिणामही जाणवत आहे. विशेषतः औषधांच्या माऱ्यामुळे म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार होतो. मधुमेह असणाऱ्या रुग्णांवर अशा औषधांच्या डोसचा विपरित परिणाम जाणवत आहे. मात्र, जिल्ह्यातील डाॅक्टरांनी आगोदरच काळजी घेतल्याने रुग्णांना म्युकरमायकोसिसचा सामना करावा लागला नाही. म्युकरमायकोसिस या आजारामुळे डोळे, जबडा अशा ठिकाणी बुरशी जन्य आजार होत आहे. या बुरशीचा आघात होत असल्याने डोळे निकामी होतात आणि ते काढावेही लागत आहेत, तसेच मूत्रपिंड आणि मेंदूवरही या आजाराचा आघात होऊ शकतो, असे जिल्हा सामान्य रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी राजीव तंबाळे यांनी सांगितले.
ही आहेत लक्षणे
कोविड बरा झाल्यावर काही रुग्णांना आणखी एका आजाराचा धोका आहे, तो म्हणजे म्युकरमायकोसिस. आम्ही तज्ज्ञांकडून जाणून घेतलं की, हा आजार काय आहे आणि कोणाला या आजाराचा जास्त धोका आहे. साधारणतः म्युकरमायकोसिस उपचाराचे हेवी डोस घेण्यामुळे प्रतिकारशक्ती कमी होते, तसेच नाक कोरडे होणे, गाल सुजणे, डोळे लाल होणे किंवा डोळे दुखणे ही या विकारांची मुख्य लक्षणे आहेत.