माथेरानकर अजूनही ओढताहेत रिक्षा; अमानुष प्रथा सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 8, 2019 11:12 PM2019-09-08T23:12:24+5:302019-09-08T23:12:38+5:30

पर्यावरणपूरक ई-रिक्षा सुरू करण्याची स्थानिकांची मागणी

Rickshaw still in Matherankar; Inhuman practices continue | माथेरानकर अजूनही ओढताहेत रिक्षा; अमानुष प्रथा सुरूच

माथेरानकर अजूनही ओढताहेत रिक्षा; अमानुष प्रथा सुरूच

Next

माथेरान : ब्रिटिशांनी वसवलेले वाहनांना बंदी असलेले भारतातील एकमेव पर्यटनस्थळ म्हणून नावारूपास आलेल्या माथेरानमध्ये आजही ब्रिटिशकालीन कायदे अस्तित्वात आहेत, त्यामुळे येथे वाहनांना बंदी आहे; पण हे कायदे बदलत्या काळात या पर्यटनस्थळांना तारक आहेत की मारक, ह्याचा पुन्हा विचार होणे गरजेचे आहे. हायटेकच्या या जमान्यात इतर पर्यटनस्थळे अत्याधुनिक होत असताना माथेरान मात्र मागे पडत चालले आहे, येथे आजही माणूस माणसाला हातगाडीत बसवून पोटासाठी खेचून नेण्याची अमानुष प्रथा राबवित आहे.

लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, अपंग प्रवासी यांना माथेरानमध्ये यायचे की नाही, हा प्रश्न सतावू लागला आहे. कारण हातरिक्षा सर्व सामान्य पर्यटकांसाठी खर्चिक वाहन ठरत आहे. एक रिक्षा खेचण्यास तीन माणसे लागत असल्याने साहजिकच त्यांचे भाव सर्वसामान्यांना परवडणारे नाहीत, त्यामुळे नाइलाजाने गरजूना ह्यातून प्रवास करावा लागत आहे त्यामुळे एकदा आलेले पर्यटक फक्त महागाईमुळे माथेरानकडे पाठ फिरवत आहेत. त्यामुळेच ह्याला पर्याय म्हणून पर्यावरणपूरक ई-रिक्षा माथेरानमध्ये सुरू कराव्यात, अशी मागणी जोर धरत आहे.

ब्रिटिश गेल्यानंतर भारत स्वतंत्र झाला; पण माथेरानची गुलामगिरी काही संपलेली नाही. आजही येथील स्थानिक नाइलाजाने फक्त आपल्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी हातरिक्षा सारखा गुलामगिरीचा व्यवसाय करीत आहेत. माथेरानमध्ये वास्तव्यास असलेले स्थानिक हे येथे ब्रिटिशांनी त्यांच्या बंगल्यांची देखभाल व स्वत:च्या ऐषोआरामाची व्यवस्था पाहण्यासाठी आणलेले लोकच आहेत, त्यांना येथे ना शेतीसाठी जागा दिली गेली, ना राहण्यासाठी स्वत:च्या मालकीची जागा दिली गेली. ज्या घरांमध्ये हे लोक राहत आहेत त्या जागाही भाडेतत्त्वावर देण्यात आल्या जे आजही सुरू आहे. येथे वर्षातून एक-दोन वेळा राहण्यासाठी येणाऱ्या गोऱ्यांना शांतता हवी म्हणून वाहनांना बंदी घातली गेली व बरोबर आणलेल्या मजुरांना घोड्यांच्या जागी जुंपत हातरिक्षा सुरू केल्या. कालांतराने ब्रिटिश तर निघून गेले; पण त्यांनी चढवलेले जोखड आजही माथेरानकरांच्या माथी तसेच आहे; त्यातून सुटका करण्यासाठी येथील लोक केविलवाणी धडपड करीत आहेत. मात्र, सरकारला ही धडपड अजूनही दिसलेली नाही.

गणपती बाप्पाला साकडे
दहावीपर्यंत शिक्षणाची सोय असल्याने कसेबसे शिक्षण पूर्ण करून पुढे काहीही भवितव्य नसल्याने हातरिक्षा सारखा रक्ताचे पाणी करणारा व्यवसाय येथील लोक करत आहेत. येथील स्थानिकांचे अनेक प्रश्न आहेत, त्यातील बेरोजगारी हा मुख्य प्रश्न वाढत चाललेला आहे. मात्र, त्याचे सोयरसुतक कोणालाही नाही.

येथील तरुणांच्या उज्ज्वल भवितव्यासाठी शासनाकडे कोणत्याही योजना नाहीत. माथेरानबाहेर जाऊन शिक्षण घेण्याची सर्वांची आर्थिक परिस्थिती नसल्याने ई-रिक्षा हा येथील बेरोजगार तरुणांना एक चांगला पर्याय ठरू शकतो, ई-रिक्षाचे अनेक फायदे माथेरानला लाभू शकतात. यामुळे ज्येष्ठ नागरिक, शालेय विद्यार्थी,अपंग पर्यटकांना माथेरानमध्ये येण्यासाठी स्वस्त पर्याय तर मिळणारच आहे; पण येथील बेरोजगारीचा प्रश्नही काही प्रमाणात सुटणार आहे.

सर्वात महत्त्वाचे म्हणजे ह्या गुलामगिरीच्या व्यवसायातून येथील स्थानिकांची सुटका होणार आहे, यासाठी माथेरानमधील सामाजिक कार्यकर्ते सुनील शिंदे हे सरकार दरबारी ई-रिक्षासाठी गेली अनेक वर्षे उंबरठे झिजवत आहेत व त्यांना पाठिंबा मिळावा म्हणून माथेरान चर्मकार समाजाचे अध्यक्ष हेमंत पवार यांनी आपल्या घरी गणपती सजावटीत ई-रिक्षाचा देखावा करून साक्षात गणपतीसच साकडे घालताना हा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लागावा, अशी प्रार्थना केली.

Web Title: Rickshaw still in Matherankar; Inhuman practices continue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.