विशेष प्रतिनिधी अलिबाग : रायगड किल्ल्याबाबत महत्त्वाची कागदपत्रे उपलब्ध झाल्यास त्याचे जतन करून त्यावर योग्य ती कार्यवाही करावी. उत्खनन करताना ज्या इतिहासकालीन बाबी सापडतील त्यांची योग्य ती निगा राखावी. पूर्ण कामांची व्हिडीओ शूटिंग करावी. सर्वांनी एकत्र येऊन किल्ले रायगड व परिसराच्या विकासाची कामे तत्काळ सुरू करावीत, यासाठी आवश्यक ते सर्व प्रकारचे सहकार्य करण्यात येईल, असे निर्देश रायगड किल्ला विकास प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार संभाजीराजे यांनी मंगळवारी संध्याकाळी येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित आढावा बैठकीत बोलताना दिले आहे.खासदार संभाजीराजे यांनी या बैठकीत रायगड किल्ला व परिसर विकास पर्यटन आराखड्याचा आढावा घेतला. तसेच प्राधिकरणातील संबंधित अधिकाºयांना किल्ले रायगड आणि परिसर विकासाची कामे करताना कोणत्या तांत्रिक अडचणी येत आहेत, याची माहिती करून घेतली. अंदाजपत्रक, तांत्रिक मान्यता, प्रशासकीय मान्यता, ई-निविदा या बाबत काही अडचणी असल्यास त्यांचे तत्काळ निराकरण करण्यात यावे, अशा सूचना त्यांनी या वेळी दिल्या.भारतीय पुरातत्त्व विभागाकडे प्रलंबित प्रस्तावांचा पाठपुरावा करून त्यास मान्यता घेण्यात यावी. आराखड्यातील प्रस्तावित केलेल्या कामांचे वर्गीकरण करून भारतीय पुरातत्त्व विभाग व रायगड किल्ला विशेष स्थापत्य पथक यांनी त्यांना सोपविलेली कामे करावीत, अशा सूचना देण्यात आल्या. किल्ले रायगडावरील ऐतिहासिक वास्तूंचे जतन व संवर्धनाची कामे करताना ती भारतीय पुरातत्त्व विभागाच्या देखरेखीत व खबरदारी बाळगून करावीत, असेही खासदार संभाजी राजे यांनी स्पष्ट केले.या वेळी बैठकीस कोकण विभागीय आयुक्त जगदिश पाटील, जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर, माजी आयुक्त प्रभाकर देशमुख, निमंत्रित सदस्य रघुजीराजे आंग्रे, अप्पर जिल्हाधिकारी भरत शितोळे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील जाधव, प्राधिकरणाचे सदस्य आदी उपस्थित होते. रायगड किल्ला विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून किल्ल्याच्या विकासाच्या कामांना गती द्यावी अशी सूचना के ली.
किल्ल्यातील महत्त्वाच्या कागदपत्रांचे जतन करा, संभाजीराजे यांचे निर्देश
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 2:41 AM