विशेष प्रतिनिधीअलिबाग : परिसरातील शालेय विद्यार्थ्यांमधील गुणवत्तेचा शोध घेण्यासाठी लायन्स क्लब या संस्थेच्या माध्यमातून आयोजित ‘टॅलेंट हंट’ या बहुचर्चित स्पर्धेची अंतिम फेरी रविवार दि. १८ नोव्हेंबर रोजी चिंतामणराव केळकर विद्यालयात संपन्न होत आहे. यावेळी माजी लष्करी अधिकारी कॅ. स्मिता गायकवाड यांसह विविध क्षेत्रातील मान्यवर, पात्र विद्यार्थ्यांची मुलाखत घेणार असून, अंतिम विजेत्यांची निवड करण्यात येईल. या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पीएनपी नाट्यगृहात त्याच दिवशी संध्याकाळी आयोजित करण्यात आला असल्याची माहिती स्पर्धेचे समन्वयक लायन्स क्लब अलिबागचे अध्यक्ष नयन कवळे यांनी दिली आहे.
भविष्यातील स्पर्धात्मक वातावरणाला तोंड देण्याच्या दृष्टीने शालेय विद्यार्थ्यांची पूर्वतयारी करण्यासाठी आखण्यात आलेली ही स्पर्धा तीन टप्प्यामध्ये घेण्यात येते. सोमवार दि. २७ आॅगस्ट रोजी आयोजित करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात अलिबाग, रेवदंडा, मांडवा, पोयनाड, रेवस परिसरातील ४० शाळांमधून १८ हजार शालेय विद्यार्थी सहभागी झाले होते. इयत्ता ५ वी ते ७ वी आणि इयत्ता ८ वी ते १० वीच्या विद्यार्थ्यांसाठी दोन वेगवेगळ्या गटात ही स्पर्धा घेण्यात आली होती. या टप्पात सामान्य ज्ञान, गणित, विज्ञान आणि इंग्रजी या विषयावरील वस्तुनिष्ठ प्रश्नावर आधारित १५ मिनिटांच्या परीक्षेत प्रत्येकी २ गुणांचे १० प्रश्न होते. या फेरीत सहभागी झालेल्या १८ हजार विद्यार्थ्यांमधून ५५० विद्यार्थी दुसऱ्या टप्प्यातील स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत.
रविवार दि. ३० सप्टेंबर रोजी चिंतामणराव केळकर विद्यालयात संपन्न झालेल्या दुसºया टप्प्यातील मुख्य परीक्षेमध्ये सामान्य ज्ञान, गणित, विज्ञान, इंग्रजी या विषयाव्यतिरिक्त विद्यार्थ्यांच्या मानसिक क्षमतेची चाचणी घेतली गेली. या मुख्य परीक्षेच्या गुणांकनानुसार दोन्ही गटातील ५० यशस्वी विद्यार्थ्यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली आहे.यशस्वी विद्यार्थ्यांचा शानदार गौरव१८ नोव्हेंबर रोजी चिंतामणराव केळकर विद्यालयात होणार असलेल्या अंतिम फेरीमध्ये माजी लष्करी अधिकारी कॅ. स्मिता गायकवाड, आरसीएफचे महाव्यवस्थापक हेमंत कुलकर्णी, जेएसडब्ल्यूचे महाव्यवस्थापक प्रणव दीक्षित, बालमानसोपचारतज्ञ नंदिनी गोरे, नामवंत विधिज्ञ सुरेंद्र जोशी,समुपदेशक प्राची देशमुख हे विविध विषयातील तज्ज्ञ आणि अधिकारी व्यक्ती या यशस्वी विद्यार्थ्यांची मुलाखत घेतील. विद्यार्थ्यांची मानसिक क्षमता, सामान्य ज्ञान, हजरजबाबीपणा, उत्स्फूर्तपणा याची चाचणी या मुलाखतीत घेतली जाईल. यातील निवडक यशस्वी विद्यार्थ्यांचा गौरव याच दिवशी संध्याकाळी ५.३०वाजता पीएनपी नाट्यगृहात समारंभपूर्वक करण्यात येणार आहे. अंतिम फेरी बक्षीस वितरण समारंभास अलिबाग परिसरातील सुजाण नागरिक, पालकांनी बहुसंख्येने उपस्थित राहून गुणवंत विद्यार्थ्यांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन स्पर्धेचे समन्वयक लायन नयन कवळे यांनी केले आहे.