नेरळ : माथेरान मिनी बससेवा सुरळीत व्हावी व नवीन बसच्या मागणीसाठी सोमवारपासून माथेरानचे अकरा विद्यार्थी, विद्यार्थिनी व नगरसेवक दिनेश सुतार उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या दुसऱ्या दिवशीही प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या मागणीची दखल घेतली नाही. उलट औरंगाबाद (सिल्लोर) येथील दोन जुन्या बसेस कर्जत आगारात दाखल करून उपोषणकर्त्यांची कुचेष्टा केली आहे. माथेरानमध्ये उच्च शिक्षणाची सोय नसल्याने माथेरानच्या अनेक विद्यार्थ्यांना पुढील शिक्षणासाठी नेरळ किंवा कर्जतला जावे लागते. येथील विद्यार्थ्यांना बसशिवाय पर्याय नसतो. उपोषणाला बसलेल्या विद्यार्थ्यांची सोमवारी उशिरा प्रांताधिकारी दत्ता भडकवाड व कर्जत तहसीलदार रवींद्र बाविस्कर यांनी भेट घेतली. यावेळी विद्यार्थ्यांची वैद्यकीय तपासणीही करण्यात आली. कर्जत विधानसभा संघटक संतोष भोईर यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. यावेळी युवा सेनेचे आदित्य ठाकरे याच्यांबरोबर परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्याकडेही निवेदन देणार असल्याचे सांगितले. मात्र त्यांच्या आश्वासनानंतरही विद्यार्थ्यांनी उपोषण सुरूच ठेवले. (वार्ताहर)२२
विद्यार्थ्यांचा उपोषणाचा दुसरा दिवस
By admin | Published: February 10, 2016 3:12 AM