सेंट्रल पार्कच्या दुसऱ्या टप्प्यातील रखडपट्टी सुरूच; ऑनलाइन याचिकेत 3 दिवसांत २५०० नागरिकांचा सहभाग
By ऑनलाइन लोकमत | Published: September 8, 2019 11:09 PM2019-09-08T23:09:36+5:302019-09-08T23:09:58+5:30
ऑनलाइन जनहित याचिका दाखल करण्यासाठी तुकाराम कंठाळे यांनी पुढाकार घेतला आहे.
वैभव गायकर
पनवेल : लंडनच्या धर्तीवर खारघर शहरात उभारण्यात आलेल्या सेंट्रल पार्कचा दुसरा टप्पा मागील अनेक वर्षांपासून रखडला आहे. सिडकोने सेंट्रल पार्कची जाहिरात केल्याने या परिसरात नागरिकांनी मोठ्या प्रमाणात घरे खरेदी केली. मात्र, कालांतराने सिडकोने सेंट्रल पार्कच्या नियोजित दुसºया टप्प्यातील जागा खासगी विकासकांच्या घशात घालण्याचा डाव सुरू केला. दुसºया टप्प्याचे काम
मार्गी लावण्यास नेमका कोणता अडथळा आहे? असा प्रश्न उपस्थित करीत खारघरमधील काही जागरूक नागरिकांनी यासंदर्भात ऑनलाइन याचिका दाखल केली आहे.
ऑनलाइन जनहित याचिका दाखल करण्यासाठी तुकाराम कंठाळे यांनी पुढाकार घेतला आहे. तीन दिवसांत २५०० पेक्षा जास्त रहिवाशांनी यात सहभाग घेत पाठिंबा दर्शविला आहे. सिडकोमार्फत सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्या असताना दुसरा टप्पा रखडण्यामागचे कारण काय? असा प्रश्न नागरिक विचारत आहेत.
खारघर सेक्टर २३ आणि २४ मध्ये सिडकोने ३० हेक्टर जागेवर सेंट्रल पार्क साकारले आहे. सध्याच्या घडीला एकूण जागेचा ७५ टक्के भाग विकसित केला गेला आहे. दुसºया टप्प्याचा विकास अद्याप प्रस्तावित आहे. सिडकोचे माजी व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, यांनी सेंट्रल पार्कच्या दुसºया टप्प्याच्या विकासाला निर्णायक गती दिली होती. सार्वजनिक व खासगी भागीदारीतून त्यांनी दुसरा टप्पा विकसित करण्याचा निर्णय घेतला होता. याकरिता २०१४ मध्ये वित्तीय सल्लागार समितीची नियुक्तीही करण्यात आली होती. या सल्लागार समितीच्या शिफारशीनुसार, स्पर्धात्मक निविदाही मागविण्यात आल्या होत्या. अंतिम प्रक्रियेत भारतातील पहिल्या दहा अग्रगण्य कंपन्यांचा समावेश असलेल्या चेन्नईस्थित व्हीपीजी युनिव्हर्सल किंग्डम या कंपनीची अंतिम निवड करण्यात आली होती.
संबंधित कंत्राटदार कंपनीची निवड होऊन तब्बल पाच वर्षांचा कार्यकाळ लोटला तरी प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. तब्बल पाच वर्षे सिडको केवळ सेंट्रल पार्कची जाहिरात करीत आहे. येथील रहिवाशांनी सेंट्रल पार्क प्रकल्पाकडे पाहून दुप्पट दर मोजून घरे खरेदी केली आहेत. त्यांना संपूर्णत: विकसित सेंट्रल पार्कची प्रतीक्षा कायम आहे.
सिडकोच्या नियोजित दुसºया टप्प्यात आंतरराष्ट्रीय दर्जाचे मत्स्यालय, अम्युझमेंट पार्क, वॉटर पार्क, स्नो पार्क, तारांकित हॉटेल्स, व्हर्चुअल रिअॅलिटी गेम्स आदीसह एस्सल वर्ल्ड व इमॅजिका पेक्षाही भव्यदिव्य असा दुसरा टप्पा असणार आहे. सध्याच्या घडीला हा प्रकल्प पूर्ण करण्याची जबाबदारी व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र व सिडकोचे अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांच्यावर येऊन ठेपली आहे.
विशेष म्हणजे, दुसºया टप्प्यातील कामे मार्गी लावण्याची जबाबदारी सिडको संचालक बोर्डावर येऊन ठेपली आहे.
मुख्यमंत्र्यांना १५०० सह्यांचे पत्र
सेंट्रल पार्कच्या दुसºया टप्प्याची रखडपट्टी लक्षात घेता माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्राचे महाराष्ट्र सचिव तुकाराम कंठाळे यांनी खारघरमधील १५०० हजार नागरिकांचे सह्यांचे पत्र मुख्यमंत्र्यांना लेखी स्वरूपात दिले आहे. सेंट्रल पार्कचा प्रकल्प मार्गी लावा, अशी याचना पत्रात करण्यात आली आहे.
सेंट्रल पार्क बद्दल सिडकोने आम्हाला दिलेली आश्वासने पाळावीत. आम्हाला आणखी आठ वर्षे वाया घालवायची नाहीत. - संजीव नायर, रहिवासी, खारघर