श्रीवर्धन : ऐतिहासिक पार्श्वभूमी व निसर्ग सौंदर्याचे वरदान असलेला श्रीवर्धन तालुका पर्यटकांनी गजबजला आहे. शालेय सुट्टी व दिवाळी साजरी करून कौटुंबिक सहलीसाठी पर्यटक श्रीवर्धनला पसंती देत आहेत. दरवर्षीप्रमाणे या वर्षी नोव्हेंबर महिन्यापासून पर्यटकांची लगबग श्रीवर्धनमध्ये सुरू झाली आहे. वातावरणातील आल्हाददायक गुलाबी थंडी, निसर्ग सौंदर्य व सुट्टीचा आठवडा असे योग जुळून आला आहे. श्रीवर्धन नगरपालिकेने नोव्हेंबर महिन्यात पर्यटन निधीचे संकलन केले आहे. नगरपालिकेने पर्यटकांसाठी समुद्र किनारा सुशोभीकरण, प्रसाधनगृहे व जीवरक्षक दल यांची व्यवस्था केली आहे.
श्रीवर्धन तालुक्यातील श्रीवर्धन शहर, हरिहरेश्वर, दिवेआगर व दिघी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. शहरातील पेशवे स्मारक, सोमजाई मंदिर, जीवना बंदर, जीवनेश्वर मंदिर, लक्ष्मीनारायण मंदिर व समुद्र किनारा या ठिकाणी पर्यटक भेटी देत आहेत. हरिहरेश्वर ही दक्षिण काशी असल्याने पर्यटक व भाविकांनी हरिहरेश्वरमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित दर्शवली आहे. दिवेआगरचा सुंदर समुद्र किनारा व सुवर्ण गणेशाचे निवासस्थान पर्यटकांना आकर्षित करत आहे. नारळ सुपारीच्या बागा, कौलारू घरे व फेसळणारा समुद्र पर्यटकांच्या पसंतीला उतरत आहे. श्रीवर्धन व म्हसळा पोलिसांनी वाहतुकीचे नियोजन केले आहे. तरीही म्हसळा बाजार व श्रीवर्धनमधील शिवाजी चौकात गाड्यांची गर्दी झाल्याचे निदर्शनास येत आहे.पर्यटकांनी श्रीवर्धनमध्ये जास्तीत जास्त काळ वास्तव्य करावे या दृष्टीने सकारात्मक भूमिका आम्ही नगरपालिकेकडून घेत आहोत. वाहतुकीचा प्रश्न बिकट आहे. परंतु लवकरच रस्त्याचे काम मार्गी लावले जाईल. पर्यटकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न आहे.- वसंत यादव, पर्यटन सभापती, श्रीवर्धन नगरपालिकाश्रीवर्धनमध्ये पर्यटन वृद्धी व्हावी यासाठी नगरपालिका सदैव तत्पर आहे. समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांच्या सुरक्षेची योग्य ती सर्व काळजी घेतली जात आहे. सीसीटीव्ही कॅमेरे व जीवरक्षक यांची व्यवस्था केली आहे. पर्यटकांना सोई सुविधा उपलब्ध करण्यास प्राधान्य दिले आहे. - रविकुमार मोरे, मुख्याधिकारी, श्रीवर्धन नगरपालिका