वेळास-दिघी बंदर रस्त्याची झाली चाळण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 9, 2019 10:53 PM2019-09-09T22:53:00+5:302019-09-09T22:53:05+5:30
गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता जे. एम. म्हात्रे या कंत्राटदारांनी बनवण्यास घेतला आहे
गणेश प्रभाळे
दिघी : अतिवृष्टीमुळे श्रीवर्धन तालुक्यातील वेळास ते दिघी बंदर या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून दिघी बंदरातील अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणावर होते. दिघी - माणगाव - पुणे हा मार्ग राष्ट्रीय महामार्ग बनला आहे. त्यामुळे या मार्गावर आता महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाचे नियंत्रण असणार आहे. मात्र, रस्ता नूतनीकरणाकडे दुर्लक्षित होत असल्याने येथील खड्ड्यांनीच प्रवाशांचा जीव धोक्यात आला आहे.
गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता जे. एम. म्हात्रे या कंत्राटदारांनी बनवण्यास घेतला आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून हा रस्ता सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अखत्यारीत होता. त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग बनल्यानंतर हा रस्ता एमएसआरडीसीकडे वर्ग करण्यात आला. रस्ता आहे त्या अवस्थेत वर्ग झाल्याने, रस्ता बनवण्याच्या खर्चात नवीन रस्त्याचे काम करायचे, की आहे त्या रस्त्याची मलमपट्टी करायची हा प्रश्न कंत्राटदारांसमोर आहे. रस्त्याचे काम आजही अर्धवट स्थितीत आहे, त्यामुळे त्याचा त्रास हा सामान्य जनतेला होत आहे. सद्यस्थितीत रस्त्याचे काम न केल्याने रस्ता धोकादायक बनत आहे.
गेल्या आठ - दहा वर्षांपासून वेळास ते दिघी बंदर रस्त्यावरून दिघी पोर्टकडील कोळसा व कॉइल वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे. दिघी बंदर किंवा सार्वजनिक बांधकाम खात्याकडून पावसाअगोदर या रस्त्याची डागडुजी करायला पाहिजे होती. पावसाळ्यात होणारा पाण्याचा निचरा गटारातून होणे आवश्यक आहे. मात्र, ते पाणी सध्या रस्त्यावरून वाहत असल्याने रस्ता दिसेनासा होत आहेत, परंतु दोघांनीही या गोष्टीची पूर्वदखल घेतली नाही. त्यामुळे रिक्षा, मिनीडोर, दुचाकी वाहने व सर्वसामान्य नागरिकांना खड्ड्यातून मार्ग काढताना खूप त्रास सहन करावा लागत आहे. वेळास फरशी ते भरणा हा रस्ता खड्डेमय झाला आहे. येथे रस्त्याला सहा किलोमीटर अंतराचा घाट व तीव्र उतार असल्याने दुचाकीवरून जाताना मध्येच खड्डा आल्यास एखाद्याला जीवास मुकावे लागू शकते. रस्त्याच्या परिस्थितीनुसार दुरुस्तीकडे श्रीवर्धन तालुका लोकप्रतिनिधीने गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी सामान्य जनतेकडून होत आहे.
रस्त्याला जोडून असणाऱ्या डोंगरातील पाणी गटाराअभावी रस्त्यावरून वाहत आहे. मुसळधार पावसाने रस्ता खचण्याची भीती आहे. यामुळे रस्त्याची दुरुस्ती लवकरच करावी. संबंधित विभागाने भोर - वरंध घाटाची पुनरावृत्ती होण्याची वाट बघू नये. - दीपक परकर, प्रवासी
खड्ड्यांमुळे अपघातास निमंत्रण
दिघी बंदरातून मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक होते. अरुंद रस्त्यांमुळे दररोज छोटे-मोठे अपघात होतात. दिघी - पुणे राष्ट्रीय महामार्ग झाल्याचे समजले मात्र प्रत्यक्षात महामार्ग बनायला अद्याप अवकाश आहे.
दिघीपर्यंतच्या रस्त्यातील खड्डे भरायचे नियोजन आहे. या महिन्यापासून पुन्हा रस्त्याचे काम सुरू होईल. - सचिन निफाडे, उपअभियंता.
लोकप्रतिनिधींना नाही देणेघेणे
जनसेवेसाठी श्रीवर्धन मतदार संघातील आमदार, जिल्हा परिषद तसेच पंचायत समिती सदस्य निवडून दिले गेलेत मात्र, जनतेच्या विशेषत: रस्त्याबाबत असुविधेकडे सर्रास दुर्लक्ष होते.
वाहनांचे होतेय नुकसान
विशेष म्हणजे खड्डे पडलेल्या या रस्त्यावरून जाताना महिला, रुग्ण यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शिवाय रोजच्या प्रवासात वाहनांचे देखील नुकसान होत आहे. संबंधित प्रशासनाने या रस्त्याच्या डागडुजी किंवा दुरुस्तीकडे लक्ष दिले नाही तर आम्ही आक्रमक भूमिका घेऊ असा इशारा कुडगाव येथील रहिवासी महेश जाधव यांनी दिला आहे.