महाडमध्ये दुसऱ्या दिवशी पूरस्थिती कायम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 6, 2020 02:07 AM2020-08-06T02:07:04+5:302020-08-06T02:07:27+5:30
शहराला जोडणारे सर्व मार्ग बंद : अनेक गावांमध्ये दरडी कोसळण्याच्या भीती
दासगाव : गेले दोन दिवस संपूर्ण महाड तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले. मंगळवारी काही प्रमाणात तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. मात्र, बुधवारी पुन्हा पावसाने जोर कायम असल्याने शहराला आणि अनेक गावांना पुराच्या पाण्याने वेढा घातला असून अनेक मार्ग बंद झाले आहेत. काही गावामध्ये दरडी कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे.
तालुक्यातील सर्व जनजीवन विस्कळीत झाले आहे. गेले दोन दिवस संपूर्ण महाड तालुक्याला पावसाने झोडपून काढले. मंगळवारी संपूर्ण महाड तालुक्यात पूरस्थिती निर्माण झाली होती. काही प्रमाणात जनजीवन विस्कळीत झालेले असताना मंगळवारी रात्रीपासून पुन्हा पावसाने जोर कायम ठेवला. त्यामुळे पुराच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली. महाड शहराला संपूर्ण पाण्याने वेढा घातल्यामुळे शहराला जोडणारे सर्व मार्ग बंद झाले. सर्वच कामकाज ठप्प झाले. व्यापाऱ्यांमध्ये एकच भीती निर्माण झाली. २००५मध्ये अशाच प्रकारे पाऊस लागला होता आणि मोठ्या प्रमाणात संपूर्ण तालुक्याचे नुकसान झाले होते, तर अनेक गावांमध्ये दरडी कोसळून मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. पावसाची संततधार कायम असल्याने संध्याकाळपर्यंत मोठ्या प्रमाणात पुराच्या पाण्यामध्ये वाढ होत होती. त्यामुळे दासगाव, टोल, दाभोळ, जुई, सव, गोठे, रोहन आणि खाडी पट्ट्यातील अनेक गावांमध्ये दरडी कोसळण्याची भीती आहे.
मार्ग पडले बंद
सोमवारी विन्हेरे मार्गावर कुर्ला गाव हद्दीत रस्त्यावर दरड आल्याने हा मार्ग बंद पडला होता. कशेडी घाट बंद पडल्यानंतर रत्नागिरीला जाण्यासाठी हा एक पर्यायी मार्ग आहे. संध्याकाळपर्यंत सार्वजनिक बांधकाम खात्याकडून दरड साफ करण्याचे काम सुरू होते, तर पंढरपूर मार्गावरील रावढळ या गाव हद्दीतील एका पुलावर पाणी आल्याने तोही मार्ग बंद पडला होता.