कर्जत : सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते सकाळी अकरा वाजेपर्यंत जीवनावश्यक सेवा सुरू असून शनिवार - रविवार विकेंड लाॅकडाऊन असतो. त्यामुळे शुक्रवारी आणि सोमवारी खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होते. आज सोमवारी या गर्दीने कर्जत बाजारपेठेत परिसीमा गाठली. त्यावेळी सोशल डिस्टन्सिंगचे तीन तेरा वाजले. मात्र कोरोनाच्या भीतीपोटी बहुतांश जण मास्कचा वापर करताना दिसले. बाजारपेठेत गर्दी होऊ नये म्हणून फेरीवाले, भाजीवाल्यांना पोलीस ठाण्यासमोरील मैदानात हलविण्यात आले. पहिले काही दिवस पोलीस मैदानात सर्व जणांनी आपली दुकाने थाटली मात्र आता हळूहळू पुन्हा बाजारपेठेत फेरीवाले व भाजी फळ विक्रेते बसू लागल्याने नागरिकांची गर्दी वाढू लागली आहे. सकाळी सात ते सकाळी ११ ही वेळ ग्राहक व व्यापारी या दोघांसाठी गैरसोयीची आहे. कारण सकाळी सात वाजता खरेदीसाठी जास्त कुणी येत नाही आणि या दिलेल्या चार तासांपैकी दीड - दोन तास दुकान उघडून लावणे व नंतर बंद करताना आवरणे यासाठी जातात. ग्राहक खरेदीसाठी नऊसव्वा नऊपासून येतात कारण नगरपरिषदेची पाणीपुरवठा करण्याची वेळ सुद्धा त्या दरम्यान असते. त्यामुळे आधीचे दोन तास वाया जातात व उरलेल्या दोन तासात ग्राहकांची गर्दी बाजारपेठेत होते. या चार तासात भाजी व फळ विक्रेत्यांची पूर्ण भाजी किंवा फळे विकली जात नाहीत. पोलीस ठाण्यासमोरच मैदानावर ते विक्री करीत असल्याने अकराच्या ठोक्याला त्यांना दुकाने बंद करावी लागतात त्यामुळे त्यांची निम्म्याहून अधिक भाजी व फळे शिल्लक राहतात व दररोज नुकसान होते. काही ग्राहक चारचाकी गाड्या दुकानासमोर बिनधास्तपणे लावून खरेदी करीत असल्याने नाहक वाहतूक कोंडी होऊन वेळ वाया जातो. दुचाकी तर मोठ्या संख्येने बाजारपेठेत आणण्यात येतात. त्यामुळेही बाजारपेठेत गर्दी होऊन वाहतूक कोंडी होते. त्यातच कर्जत शहरातील काही ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असल्यामुळे थोडीशी पंचाईत होते. त्यामुळे सकाळची सात ते अकरा ही वेळ बदलून दुकाने सकाळी नऊ ते दुपारी एक वाजेपर्यंत सुरू ठेवल्यास गर्दीला नक्कीच आळा बसेल.
बोर्ली-मांडला : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून राज्यात व जिल्ह्यात करण्यात आलेल्या दोन दिवसांच्या वीकेंड लाॅकडाऊननंतर आज सोमवारी सकाळी बोर्ली-मांडला, नांदगाव, मजगांव परिसरात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी नागरिकांची गर्दी दिसून आली.
जिल्ह्यातकोरोना साखळी तोडण्यासाठी शासनाच्यावतीने निर्बंध लागू जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली आहे. तसेच १५ मेपर्यंत लाॅकडाऊन करण्यात आला असून वीकेंड लाॅकडाऊनआधी व नंतर बाजारपेठेत जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी परिसरातील नागरिकांची लगबग दिसून येते.