पोलादपूर : गणेशोत्सवासाठी आलेले कोकणवासीय चाकरमानी गौरी-गणपतीचे विसर्जन केल्यानंतर परतीच्या मार्गाला लागले असून पोलादपूर स्थानकातून १८ जादा एसटी गाड्यांसह काही खासगी गाड्या विविध मार्गावर मार्गस्थ झाल्या आहेत. रविवार सुट्टीचा दिवस असल्याने तसेच सोमवारी कामावर हजर होण्यासाठी अनेक चाकरमानी रविवारी सकाळपासून परतीच्या मार्गाला लागल्याने महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. त्यातच कशेडी घाट परिसरातील भोगाव हद्दीत प्रवास संथ गतीने करावा लागत असून त्यातच पर्याय रस्ते उपलब्ध नसल्याने वाहतूककोंडीचा त्रास सहन करावा लागत आहे.
राज्यातील कोकणवासीय गणेशोत्सवासाठी आपल्या मूळ गावात दाखल होत असतात. पाच दिवसांचे गणपती आणि गौरी विसर्जनानंतर आता या चाकरमान्यांनी मुंबईचा परतीचा रस्ता धरला आहे. खासगी गाड्यांसह एसटी बसेसने मुंबई, ठाणे, नालासोपारा, भिवंडी, कल्याण, भार्इंदर आदींसह सुरत, भडोच, बारडोल, अहमदाबाद आदी ठिकाणी सकाळी ६ वाजल्यापासून मार्गस्थ झाले आहेत. पुणे पिंपरी चिंचवडकडे जाणारे प्रवासी मुंबई -गोवा महामार्ग माणगाव निजामपूर ताम्हानी तर काही प्रवासी वाकण पाली खोपीली मार्गे जात आहेत तर पोलादपूरकर महाबळेश्वर मार्गे रवाना होत आहेत. खेड, चिपळूण, दापोली, रत्नागिरी, गुहागर आदी भागातील चाकरमानी महाबळेश्वरसह कोयना मार्गे पुणे, पिंपरीकडे रवाना होत आहेत.
मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्याने पोलादपूर स्थानकातून १८ जादा गाड्या मुंबई, बोरीवली,ठाणे, नालासोपारा, पुणे आदी ठिकाणी सोडण्यात आल्या तर काही प्रवाशांनी खासगी टेम्पोट्रॅव्हल,लक्झरीने प्रवास करण्यासाठी रांग लावल्याचे चित्र पोलादपूर बसस्थानाकसह महामार्गावरील खासगी वाहतूक व्यावसायिकांकडे दिसून आले.पुणेकरांना करावा लागतोय लांबचा प्रवासभोर घाट बंद असल्याने ताम्हानी मार्गासह महाबळेश्वर मार्गे पुण्यामध्ये जावे लागत आहे त्यातच ताम्हानी घाट मार्ग खड्डेमय तसेच पुणे जिल्हा हद्दीत नवीन मार्गाचे काम सुरू असल्याने सदरचा प्रवास सुखाचा नसल्याने शरीराची हाडे खिळखिळी करणारा व वेळ खाणारा बनला आहे तर पोलादपूर सह खेड दापोलीकर महाबळेश्वर वाई सुरुर या राज्य मार्गावरून सुरुर फाटापर्यंत जात आहेत. पुढे पुणे- बंगळुरू महामार्गाने पुण्याकडे मार्गस्थ होत आहेत. या मार्गावर काही ठिकाणी काम सुरू असल्याने वाहतूककोंडी सातत्याने असते त्यातच टोल नाक्यावर रांगा लागत असल्याने पाच सहा तासांचा प्रवास सात आठ तास लागत असल्याचे प्रवाशांनी सांगितले. महामार्गाप्रमाणे शासनाने पर्यायी मार्ग निर्माण करणे गरजेचे आहे त्याचप्र्रमाणे कोकण रेल्वेचे दुपदरीकरण करणे गरजेचे आहे. या दोन्ही मार्गिकांप्रमाणे कशेडी घाट, आंबेनळी घाट, ताम्हानी घाट या प्रमुख घाट मार्गाना पर्याय निर्माण करणे क्रमप्राप्त झाले आहेखासगी वाहनचालकांची चंगळअनेक खासगी वाहनचालक मालक गर्दीचा फायदा उठवत प्रवाशांकडून जादा पैसे आकारत आहेत तर काही वाहनचालक मालक सरसकट भाडे ठरवून मार्गस्थ होत आहेत. गुजरात राज्यात जाण्यासाठी महाड आगाराची एसटी सेवा नसल्याने गुजरात राज्यातील बस सेवेवर प्रवाशांना अवलंबून रहावे लागत आहे. पोलादपूर स्थानकातून अहमदाबाद तर महाड आगारातून सुरत गुजरात मंडळाच्या बसेस सोडण्यात येत आहे. पोलादपूर स्थानकात लांब पल्ल्याच्या गाड्या थांबण्यास जागा नसल्याने अनेक बसेस महामार्गावर उभ्या राहिल्याचे चित्र दिसून आले आहे तीच परिस्थिती महाड आगाराची झाली होती.मुंबईकडे जाणाऱ्यांचे हालपेण : गणेशोत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने चाकरमानी आले होते. या चाकरमान्यांची परतीच्या प्रवासासाठी गर्दी दिसून येत आहे. कोकणातून मुंबईकडे एसटी बसेस गाड्यांना पूर्णपणे गर्दी असल्याने वडखळ, रामवाडी, पेण आदि ठिकाणाहून मुंबईकडे जाणाºया प्रवाशांचे हाल होत आहे. गाड्या तुडुंब भरून जात आहेत. गाडीत पाय ठेवण्यासाठी जागा नसल्याचे चित्र दिसत आहे. मुंबईकडे जाणारी गाडी आली की गाडीत चढण्यासाठी लोकांची झुंबड उडत असल्याचे दिसून येत आहे. एसटी बस गाड्यांना गर्दी असल्याने खासगी बसेस, सुमो, जीप आदि वाहनांचा आधार घेण्यात येत असून लोकांच्या अडचणीचा व चालून आलेल्या संधीचा फायदा या खासगी वाहतूकदारांनी घेतला आहे.