लोकमत न्यूज नेटवर्कमहाड : मंडणगड-नालासोपारा ही एस.टी. बस महाड तालुक्यातील केंबुर्ली गावहद्दीत आल्यावर धावत्या बसची दोन्ही चाके निखळल्याची घटना बुधवारी घडली. ही बस रस्त्याच्या कडेला घसरली. मात्र सावित्री नदीमध्ये पडता-पडता थोडक्यात वाचली; अन्यथा २०१६ ची पुनरावृत्ती घडली असती. या बसमधून जवळपास ४० प्रवासी प्रवास करीत होते. या घटनेमुळे प्रवाशांमध्ये एस.टी. महामंडळाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.
मंडणगड आगाराची मंडणगड-नालासोपारा ही एसटी मंडणगड आगारातून सकाळी महाड डेपोमध्ये आली होती. सकाळी १० वाजता ती बस महाडहून मुंबईकडे जाण्यास रवाना झाली. तालुक्यातील केंबुर्ली गावहद्दीत एका वळणावर ही बस धावत असताना ॲक्सलसह उजव्या बाजूची दोन्ही चाके निखळली आणि काही अंतर ही बस घसरत गेली. बाजूलाच सावित्री नदी होती. मात्र थोडक्यात बस नदीत जाता-जाता वाचली.
२ ऑगस्ट २०१६ रोजी याच महामार्गावरील सावित्री नदीवर पुलाचा कठडा तोडून बस नदीपात्रात कोसळून मोठी दुर्घटना घडली होती. त्यामध्ये २२ प्रवाशांचा नाहक बळी गेला होता. बुधवारी त्याच घटनेची पुनरावृत्ती चालकाच्या प्रसंगावधानामुळे टळली.
परीक्षणशिवाय धावतात लांब पल्ल्याच्या बसअनेक आगारांतून सुटणाऱ्या लांब पल्ल्याच्या बसचे कोणतेच परीक्षण केले जात नाही. त्याचबरोबर वाहनासाठी सोबत लागणारे साहित्य (टुल बॉक्स) ही दिले जात नाही. त्याचा त्रास मात्र प्रवाशांना भोगावा लागतो. रस्त्यामध्ये एखादी बस पंक्चर झाली तर त्या चालकाला इतर वाहनांची साहित्यासाठी वाट पाहावी लागते.