बचतगटाच्या माध्यमातून कापडी पिशव्यांचा उद्योग, पर्यावरण -हास रोखणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 8, 2017 03:42 AM2017-10-08T03:42:48+5:302017-10-08T03:43:06+5:30
प्लास्टिकचा भस्मासुर दिवसेंदिवस वाढतच आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाला हानी पोहोचून निर्सगाला संकटात लोटण्याचे काम सध्या सुरू आहे; परंतु वेळ आली की, निर्सग आपल्यावर काहीच घेत नाही.
- आविष्कार देसाई ।
अलिबाग : प्लास्टिकचा भस्मासुर दिवसेंदिवस वाढतच आहे. प्लास्टिकमुळे पर्यावरणाला हानी पोहोचून निर्सगाला संकटात लोटण्याचे काम सध्या सुरू आहे; परंतु वेळ आली की, निर्सग आपल्यावर काहीच घेत नाही. आपत्ती, भूकंप, त्सुनामी, वादळ, ज्वालामुखी अशा विविध माध्यमांतून तो मानवाला त्याची परतफेड करत असतो, हे रोखायचे कसे? या विचारात असतानाच एका मैत्रिणीने कापडी पिशव्या माझ्या पुढ्यात ठेवल्या आणि बस्स... उपाय सुचला, असे फॅशन डिझायनर असलेल्या अलिबागमधील प्रार्थना नागवेकर यांनी सांगितले.
ड्रेस डिझायनिंगचा व्यवसाय करायचा सोडून कापडी पिशव्या बनवण्याचा उद्योग त्यांनी सुरू केला आहे. प्लास्टिकला रोखायचे असेल, तर त्याला कापडी पिशवी हाच पर्याय असल्याचे त्यांना उमगले. त्यांनी प्रार्थना जेएलजी या नावाने महिलांचा बचतगट स्थापन केला.
अलिबाग येथे त्यांनी सुरू केलेल्या छोटेखानी कारखान्यामध्ये १४ महिलांना रोजगारही उपलब्ध करून दिला आहे. त्या महिलांना स्वाभिमानाने जगण्याला व्यासपीठ दिले आहे. स्वत:चा कोणताच आर्थिक स्रोत नसणाºया या महिला आता महिन्याला पाच हजार रुपये कमवतात. ड्रेस डिझायनर म्हणून त्यांना या क्षेत्रामध्ये बक्कळ पैसा कमावता आला असता. मात्र, पैसा हे एकच ध्येय न ठेवता राष्ट्रहितासाठी प्लास्टिकला हद्दपार करण्याचा त्यांचा प्रयत्न वाखणण्या सारखाच असल्याचे दिसून येते.
प्रार्थना यांची मैत्रीण अर्पणा पाटील यांनी त्यांच्यासमोर अचानकपणे एके दिवशी कापडी पिशव्या समोर ठेवल्या. त्यानंतर त्यांनी या माध्यमातूनच प्लास्टिकला पर्याय देण्याची तयारी सुरू केली. प्लास्टिकचे विघटन होत नसल्याने ते निर्सगाला आणि पर्यायाने मानवालाही घातक आहे. आपल्या लहानपणी दळण आणण्यासाठी आई कापडी पिशवीच देत होती. त्या वेळी सर्रासपणे आपण कापडी पिशव्यांचाच वापर करायचो, असे प्रार्थना यांनी सांगितले.
विविध आकाराच्या, रंगाच्या, चैन लावलेल्या, हॅण्डल असलेल्या कापडी पिशव्यांची निर्मिती करण्यावर भर दिला. दीड रुपयांपासून ते साडेचार रुपयांपर्यंत पिशव्या उपलब्ध असल्याचे त्यांनी सांगितले. महिन्याला पाच हजार पिशव्या बनवल्या जातात; परंतु हा आकडा ज्या वेगाने मार्केटमध्ये प्लास्टिकच्या पिशव्या येतात त्यापेक्षा किती, तरी कमी आहे. जनजागृतीच्या माध्यमातून प्लास्टिकचा वापर निश्चितच कमी करता येण्यासारखा असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्रहितासाठी प्लास्टिक वापरणार नाही, याची खुणगाठ प्रत्येकाने आपल्या मनाशी बांधल्यास निसर्गाच्या प्रकोपापासून आपण वाचू शकतो.