- संतोष सापतेश्रीवर्धन : श्रीवर्धन शहरांचे प्रवेशद्वार असलेल्या बोडणी घाटात अपघाताची मालिका सुरू आहे. २०१२ ते २०१८ दरम्यान झालेल्या अपघातांत अनेकांना जीव गमवावा लागला आहे; परंतु सार्वजनिक बांधकाम खात्याने अद्याप याबाबत गांभीर्याने विचार केलेला नाही. अपघात टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजनांमध्ये त्रुटी आहेत. अपघातप्रवण क्षेत्रात सूचना फलकाव्यतिरिक्त काहीच काम केल्याचे दिसत नाही.पर्यटनक्षेत्र म्हणून श्रीवर्धन नावारूपाला येत आहे. श्रीवर्धन नगरपरिषद प्रत्येक महिन्याला ७० हजार रु पये पर्यटक निधी जमा करते. वर्षभर असंख्य पर्यटक श्रीवर्धनमध्ये हजेरी लावत असून, विशेषत: मुंबई, पुण्यातील पर्यटक वीकेण्डला या ठिकाणी पसंती दर्शवतात. त्यासाठी माणगाव शहरातून लोणेरे व साई मार्गे पर्यटक श्रीवर्धनकडे मार्गक्र मण करतात.माणगाव साई मार्गे श्रीवर्धन ४८ किलोमीटर अंतर आहे, तर मुंबई-गोवा महामार्गावरील लोणेरेपासून श्रीवर्धन ५० किलोमीटर अंतरावर आहे. पर्यायाने पर्यटक दोन्ही मार्गांचा अवलंब करतात. साई मार्गे श्रीवर्धन हमरस्त्यावर नाइटने, घोणसा, तळवडे फाटा, जांभूळ, वडघर पांगलोली व बोडणी ही अपघात प्रवण क्षेत्रे आहेत. वडघर पांगलोली व बोडणी या दोन्ही क्षेत्रांत गेल्या तीन-चार वर्षांत अपघाताचे प्रमाण वाढले आहे.वडघर पांगलोली ते जसवली आयटीआय या सहा किलोमीटर अंतरावर तीव्र उतार आहे. नवीन येणाऱ्या वाहनचालकांना सहजासहजी रस्त्यावरील वळणांचा अंदाज येत नाही. बोडणी घाटाच्या उजव्या बाजूला बापवली, गुलदे, मामवली, निरंजन वाडी व मेघरे ही गावे वसलेली आहेत. श्रीवर्धनच्या मुख्य रस्त्याला जोडून या गावांचा रस्ता आहे. तुरळक वाहतूक मेघरे रस्त्यावरून होते. बोडणी घाटातील मुख्य वळणावर संरक्षण भिंतीची आवश्यकता आहे, कारण येणाºया वाहनास ब्रेक न लागल्यास किंवा उताराची तीव्रता लक्षात न आल्यास, वाहन सरळ दोनशे फूट खोल दरीत जाते. सदर मुख्य वळणावर आतापर्यंत असंख्य अपघात झाले आहेत.श्रीवर्धनमधील पर्जन्यमान लक्षात घेता, पावसाळ्यात अपघात ही नित्याचीच बाब आहे. सार्वजनिक बांधकाम खाते व इतर शासकीय यंत्रणा अपघात नियंत्रणासाठी उपाययोजना राबविण्यात उदासीन दिसून येत आहे. श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर हे दक्षिण काशी समजले जाणारे पवित्र तीर्थक्षेत्र आहे. येथेही वर्षभर पर्यटकांची गर्दी असते. पर्यटनदृष्ट्या श्रीवर्धनचा विकास करताना, बोडण घाट मार्गावरील अपघात रोखण्यासाठीही प्रयत्न करणे गरजेचे असल्याचे स्थानिक तसेच चालकांचे म्हणणे आहे.श्रीवर्धन-लोणेरे रस्त्यासाठी १२५ कोटी रु पयांची तरतूद केली आहे. त्या संदर्भात ई-निविदा तयार आहेत. लवकरच कामास सुरु वात करण्यात येणार आहे, तसेच घाटमार्गावरील अपघातप्रवण क्षेत्रात योग्य ते सूचना फलक लावले असून, अन्य उपाययोजनांसाठीही प्रयत्न सुरू आहेत.- व्ही. एन. गायकवाड, उप अभियंता,सार्वजनिक बांधकाम खाते, श्रीवर्धनबोडणी घाटातील अपघाताचे वाढते प्रमाण चिंताजनक आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याने त्यांचे काम व्यवस्थित पार पाडावे. संबंधित रस्त्यावर सूचनाफलक, गतिरोधक, संरक्षण भिंत आदी योग्य सर्व उपाययोजना करणे आवश्यक आहे. श्रीवर्धनकडे पर्यटक व भाविक यांचा ओघ वाढत आहे. त्यांच्या सुरक्षेस नगरपालिका प्राधान्य देत आहे.- वसंत यादव, सभापती,पर्यटन विकास, श्रीवर्धन नगरपालिकाम्हसळा श्रीवर्धन रस्त्यावर वाहतूक वाढली आहे. सार्वजनिक बांधकाम खाते योग्य ती खबरदारी घेत नाही, रस्त्याचे काम व्यवस्थित करत नसल्याचे चालकांची वारंवार तक्रार आहे. विशेषत: पावसाळ्यात रस्त्यांची दुर्दशा होत असल्याने अपघात होतात. बोडणी घाटात रस्त्याच्या दुतर्फा संरक्षण भिंतीची आवश्यकता आहे.- अविनाश कोळंबेकर, तालुका अध्यक्ष,विक्र म चालक-मालक संघटनाएसटीची वाहतूक माणगाव-श्रीवर्धन रस्त्यावर सतत सुरू असते. बोडणी घाटात प्रामुख्याने बापवली रस्त्याच्या मार्गावर संरक्षक भिंतीची आवश्यकता आहे, तसेच अन्य उपाययोजना गरजेच्या आहेत. राज्य परिवहन मंडळाच्या चालकांना वेळोवेळी वाहतुकीसंदर्भात योग्य सूचना महामंडळामार्फत दिल्या जात आहेत.- रेश्मा गाडेकर,आगारप्रमुख, श्रीवर्धन
बोडणी घाटातील प्रवास जीवघेणा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:08 AM