२४ रुग्णांवर उपचार सुरूच, १९ रुग्णांची प्रकृती चिंताजनक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 06:00 AM2018-06-21T06:00:19+5:302018-06-21T06:00:19+5:30
सोमवारी अष्टविनायक क्षेत्र महड येथील वास्तुशांतीच्या जेवणातून झालेल्या विषबाधेमुळे तीन चिमुकल्यांना प्राण गमवावे लागले
खोपोली : सोमवारी अष्टविनायक क्षेत्र महड येथील वास्तुशांतीच्या जेवणातून झालेल्या विषबाधेमुळे तीन चिमुकल्यांना प्राण गमवावे लागले, तर तब्बल ८८ जणांना विषबाधा झाल्याने संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली. मिळालेल्या माहितीनुसार, विविध रुग्णालयांत अजूनही २४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. पैकी १९ रुग्ण अतिदक्षता विभागात व्हेंटिलेटरवर असून, त्यापैकी ३ रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे.
मृत्यू झालेल्या तीन मुलांपैकी एकावर मंगळवारी संध्याकाळी, तर भाऊ-बहीण असलेल्या दोघांवर बुधवारी सकाळी शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांच्यासह पनवेल येथील विविध रुग्णालयांत जाऊन सुरू असलेल्या उपचारांची पाहाणी केली. या घटनेबाबत खालापूर पोलिसांत गुन्हा दाखल झाला असून,
स्थानिक पोलीस अधिक तपास करीत आहेत.
अन्न व औषध विभाग, फॉरेन्सिक लॅबचा सविस्तर अहवाल प्राप्त झाल्याशिवाय नेमके कारण स्पष्ट होणार नसल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवस निश्चित माहिती मिळण्यासाठी लागतील, असेही पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले.
रुग्णालय व उपचार घेत असलेल्या रुग्णांची स्थिती :
एमजीएम रुग्णालय : १ रुग्ण अतिदक्षता विभागात दाखल
डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालय : ३ रुग्ण; १२ अतिदक्षता विभागात तर २ जनरल वॉर्ड
अष्टविनायक रुग्णालय पनवेल : १ रुग्ण अतिदक्षता विभागात
शेलार हॉस्पिटल पनवेल : ६ रुग्ण, पैकी ३ अतिदक्षता विभागात तर ३ जनरल वॉर्ड
गांधी हॉस्पिटल पनवेल : ४ रुग्ण ; सर्व ४ अतिदक्षता विभागात
प्राचीन हॉस्पिटल पनवेल : ३ रुग्ण, पैकी ३ अतिदक्षता विभागात
चिराग हॉस्पिटल पनवेल : १ अतिदक्षता विभागात
सुखम हॉस्पिटल पनवेल : ३ अतिदक्षता विभागात तिघांची स्थिती अतिचिंताजनक
पार्वती हॉस्पिटल खोपोली : २ रुग्ण, दोन्ही अतिदक्षता विभागात
यातील नामदेव नकुरे (वय २८), नीलम नकुरे (वय २३) व गोपीनाथ नकुरे (वय ५३) हे सुखम हॉस्पिटल, पनवेल येथे उपचार घेत असलेले ३ रुग्ण अतिदक्षता विभागात असून, तिघांची स्थिती चिंताजनक असल्याचे समजते.