अनधिकृत गोदामाचा स्थानिकांना त्रास, रसायनांमुळे स्फोटाचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 03:56 AM2018-10-01T03:56:11+5:302018-10-01T03:56:52+5:30
अनधिकृत भंगार गोदामात महाड एमआयडीसीमधील ज्वलनशील रसायनांच्या टाक्यांची तोडफोड केली जात असल्याने या रसायनांचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.
बिरवाडी : महाड तालुक्यामधील बिरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील भंगार गोडाऊनचा नागरिकांना त्रास होत आहे, याबाबत महाड एमआयडीसी पोलीस ठाणे व ग्रामपंचायत बिरवाडी यांच्याकडे तक्रार दाखल करण्यात आली होती. या प्रकरणी संबंधितांना ग्रामपंचायतीने नोटीस बजावली आहे.
महाड तालुक्यातील बिरवाडी ग्रामपंचायत हद्दीतील कुंभारवाडा येथील प्रतिभा प्रकाश खराडे यांच्या तक्रारीवरून बिरवाडी हद्दीतील कुंभारवाडा येथील मिळकत क्र मांक १०८३ निवासस्थान आहे. त्याच्या शेजारी दोन्ही बाजूला अनधिकृत भंगार गोदाम असून, या ठिकाणी रसायनांचे ड्रम व प्लॅस्टिक भंगाराची साठवणूक करण्यात आली आहे. त्याच्या उग्र वासाचा त्रास स्थानिकांना होतो. ड्रममधील शिल्लक रसायन अनेकदा जमिनीवर ओतले जाते. परिणामी, ते जमिनीत मुरून बोअरवेलमधून दूषित पाणीपुरवठा होत आहे. तर अनेकदा पिण्याच्या पाण्यालाही दुर्गंधी येते.
अनधिकृत भंगार गोदामात महाड एमआयडीसीमधील ज्वलनशील रसायनांच्या टाक्यांची तोडफोड केली जात असल्याने या रसायनांचा स्फोट होऊन मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. ३० आॅगस्ट, २०१८ रोजी दिलेल्या लेखी निवेदनाची दखल महाड एमआयडीसी व ग्रामपंचायत बिरवाडी यांनी घेतलेली नाही. याबाबत आरोग्य विभागासही कळवण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. बिरवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच प्रीती लक्ष्मण वाडकर यांनी ७ सप्टेंबर, २०१८ रोजी मुबारक अली वाजीद अली शाह, कुंभारवाडा, बिरवाडी यांना लेखी पत्राद्वारे भंगार गोदामातील रासायनिक ड्रम, तसेच प्लॅस्टिक भंगारसाठा अनधिकृतरीत्या करण्यात आलेला असून, परिसरातील नागरिकांना त्याचा त्रास होत असून, पाणीसाठा दूषित झाल्याची तक्र ार केली आहे. त्यामुळे हा भंगारसाठा तत्काळ बंद करावा, अन्यथा कारवाई करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
संबंधित प्रशासनाकडून दुर्लक्ष
च्महाड एमआयडीसीमध्ये काही वर्षांपूर्वीच अनधिकृत भंगारसाठ्यांमध्ये केमिकलचा स्फोट होऊन सहा कामगार मृत्युमुखी पडले होते. या घटनेनंतर संबंधितांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
च्मात्र, बिरवाडी ग्रामपंचायतीमधील कुंभारवाडा येथील महिला तक्र ारदारांनी केलेल्या तक्र ारीनुसार, महाड एमआयडीसी व परिसरातील अनधिकृत भंगार गोडाऊन संबंधित यंत्रणेकडून अभय दिले जात असल्याचे दिसून येत आहे.
च्पोलीस प्रशासन व स्थानिक ग्रामपंचायतींच्या वरदहस्तामुळे अनधिकृत भंगार गोडाऊनचा व्यवसाय तेजीत सुरू असल्याने या प्रकरणी वरिष्ठांनी लक्ष घालण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांकडून केली जात आहे.