अदिवासीवाड्यांमध्ये सुविधांची वानवा, रुग्णांना नेण्यासाठी आजही झोळीचा वापर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2017 07:04 AM2017-11-27T07:04:29+5:302017-11-27T07:05:05+5:30
कर्जत तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत हद्दीतील माणगाव ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या धाईबाई गोमा पारधी यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांच्या नातेवाइकांना त्यांना रात्रीच्या वेळी झोळी करून रुग्णालयात न्यावे लागले.
- कांता हाबळ
नेरळ : कर्जत तालुक्यातील माणगाव ग्रामपंचायत हद्दीतील माणगाव ग्रामपंचायतीच्या माजी सदस्या धाईबाई गोमा पारधी यांच्या पोटात दुखत असल्याने त्यांच्या नातेवाइकांना त्यांना रात्रीच्या वेळी झोळी करून रुग्णालयात न्यावे लागले. कर्जत तालुक्यातील अनेक आदिवासीवाड्यांमध्ये मूलभूत सुविधा नसल्याने अनेक अडचणींचा सामना या आदिवासी बांधवांना करावा लागत आहे. येथील रस्त्यांची तर बिकट अवस्था असून, अनेकांना वेळेत उपचार मिळत नसल्याने आपला जीव गमवावा लागत आहे. तेव्हा तालुक्यातील आदिवासीवाड्यांकडे लक्ष देण्याची मागणी प्रशासन आणि सरकारकडे आदिवासी बांधवांकडून करण्यात येत आहे.
कर्जत तालुक्यातील खाणीची वाडी येथील आदिवासी कातकरी समाजातील विवाहित महिलेला आठवड्याभरापूर्वी रक्ताच्या उलट्या होऊ लागल्याने, तिला तातडीने रुग्णालयात नेत असताना रस्त्याच्या सुविधेंअभावी या महिलेला चादरींची झोळी करून नेत असताना, रस्त्यातच मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पुन्हा बेकरेवाडीतही अशीच घटना घडली आहे. बेकरेवाडी येथील माजी ग्रामपंचायत सदस्या धाईबाई गोमा पारधी यांच्या छातीत अचानक दुखू लागल्याने त्यांच्या घरच्या पुरुष मंडळींनी त्यांना रुग्णालयात घेऊन जाण्याचे ठरविले; परंतु रस्ता नसल्याने या महिलेला झोळी करून न्यावे लागले. सुदैवाने धाईबाई पारधी या सुखरूप आहेत. १० दिवसांपूर्वी त्यांच्याच सुनेला प्रसूतीसाठी नेत असताना तिची रस्त्यातच प्रसूती झाल्याचे त्यांनी सांगितले; परंतु अशा परिस्थितींना अजून किती दिवस सामोरे जावे लागणार? असा प्रश्न अदिवासींनी उपस्थित केला आहे.
माणगाव ग्रामपंचायत हद्दीत बेकरेवाडी असून, सुमारे २८ घरांची येथे वस्ती आहे; परंतु येथील आदिवासी समाजाला अनेक मूलभूत सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. या वाडीत येण्यासाठी धड रस्ताही नाही, तसेच एकच विहीर असल्याने काही दिवसांत येथे पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. अशा अनेक सुविधांपासून अदिवासी समाजाला वंचित राहावे लागत आहे.
निवडणुका आल्या की, अनेक पुढारी आणि उमेदवार आदिवासीवाड्या-पांड्यांवर गस्त घालून बसतात. मात्र, अशा पुढाºयांना आता आदिवासी समाजाचे होणारे हाल दिसत नाहीत का? असाही प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे. आदिवासींच्या लोकसंख्येनुसार राज्याच्या बजेटमध्ये अर्थिक तरतूद केली जाते. विकासासाठी अनेक योजना आखल्या जात आहेत. तसेच कोट्यवधी रुपयांचा खर्च दाखविला जातो, असे असतानाही मात्र आदिवासींच्या विकासाचा लवलेशही कुठेच दिसत नाही. हे कर्जत तालुक्यात विदारक वास्तव आहे.
निवडणूक काळात आश्वासनांची पुढाºयांची खैरात
निवडणूक काळात आदिवासी लोकांचे उंबरठे झिजवून आदिवासींची हाजी हाजी करणाºया पुढाºयांनी अशा काळात आदिवासी समाजाला साथ देण्याची खरी गरज आहे.
अनेक वाड्यांमध्ये आता पाणीटंचाईची समस्या सुरू होणार आहे, त्यासाठी काही उपाययोजना आखण्याची खरी गरज आहे.
माझ्या छातीत अचानक दुखत असल्याने घरच्या पुरुष मंडळींनी मला झोळी करून दवाखान्यात नेले. रस्ता नसल्याने आमच्या अदिवासी लोकांचे मोठे हाल होत आहेत. त्याचा त्रास आमच्या आदिवासी समाजाला होत आहे. तरी शासनाने आम्हाला चांगला रस्ता करून द्यावा.
- धाईबाई पारधी,
माजी ग्रामपंचायत सदस्या
आदिवासी बांधव
अद्यापही दुर्लक्षितच
१कर्जत तालुक्याप्रमाणेच रायगड जिल्ह्यातील इतर तालुक्यांतील आदिवासीवाड्यांमध्ये पाणी, रस्ते, वीज, आरोग्य अशा मूलभूत सुविधांची वानवा असून यामुळे आदिवासी बांधवांचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.
२आदिवासी वाडे-पाड्यांवरील मुलांना शिक्षणाचे धडे गिरवण्यासाठी पायपीट करावी लागत आहे, तर अनेक ठिकाणी शिक्षणांपासून ही मुले वंचित राहत असल्याने आदिवासी समाज अशिक्षित राहत आहे. याकडे लक्ष देणे गरजेचे आहे.
३आदिवासी वाड्या-पाडे हे दुर्गम अशा डोंगराळ भागात वसलेल्या असल्यामुळे याकडे कोणाचेही लक्ष जात नाही. येथील आदिवासी बांधवांना स्वातंत्र्य प्राप्तीनंतरही अनेक सुविधांपासून वंचित राहावे लागत आहे. सरकारचेही याकडे दुर्लक्ष होत आहे.