अलिबाग : विक्रम, मिनिडोअर व्यवसाय करणारे हे मतदार नाहीत का ? आमच्याच प्रलंबित मागण्या दूर करण्यात राजकीय नेते, प्रशासन, शासन चालढकलपणा करीत आहेत. पालकमंत्री यांनी जनता दरबारमध्ये जिल्हाधिकारी यांना बैठक लावण्याचे निर्देश देऊनही कानाडोळा केला. त्यामुळे आम्हाला आमच्या न्यायिक मागण्यासाठी आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबला लागला आहे. गुरुवार सायंकाळ पर्यंत निर्णय न झाल्यास शुक्रवार पासून रस्त्यावर एकही वाहन फिरणार नसून उपोषण सोडले जाणार नाही असा इशारा रायगड जिल्हा विक्रम मिनिडोअर संघटनेचे अध्यक्ष विजय पाटील यांनी प्रशासनाला दिला आहे.
जिल्ह्यातील १३ हजार कुटुंब विक्रम, मिनीडोअर व्यवसायावर चरितार्थ चालवत आहेत. मात्र या व्यवसायावर प्रशासन कुऱ्हाड फिरविण्याचा उद्योग करीत आहेत. गेल्या तीन वर्षापासून प्रलंबित न्यायिक मागण्यासाठी व्यवसायिक आवाज उठवत आहेत. मात्र त्यांना न्याय मिळालेला नाही आहे. यासाठी अखेर आमरण उपोषणाचा पवित्रा उचलण्यात आला आहे. गुरुवारी १० नोव्हेंबर रोजी शेकडो विक्रम, मिनीडोअर चालकांनी अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. आपल्या मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी डॉ महेंद्र कल्याणकर याना शिष्टमंडळाने दिले आहे.
विक्रम, मिनीडोअर हा व्यवसाय गेल्या पंचवीस वर्षांपासून जिह्यात सुरू आहे. अनेक वाहने ही जुनी झाली आहेत. २० व २५ वर्ष जुनी झालेल्या वाहनांना दोन वर्ष वाढवून द्या, जुन्या परमिट वरील रिक्षा स्क्रॅप केल्यानंतर बदली वाहनाला बीएस वीआय मानांकन वाहनाला सीएनजी वापरण्यास मान्यता द्या. परवाना धारकांना व्यवसाय कराचा भरणा करताना व्याज सूट द्यावी, परवाना हस्तांतरण शुल्कात कपात करावी. विलंब वाहन नोंदणी दंड माफ करावा, महाड किंवा माणगाव येथे पासिंग ट्रक मंजूर करावा. जिल्ह्यातील विक्रम, इको, मिनीडोअर, मॅजिक, टॅक्सी या प्रवासी वाहनांना पर्यटनास जाण्यास परवानगी द्यावी. या प्रमुख वीस प्रलंबित मागण्याचे निवेदन जिल्हाधिकारी याना दिले आहे.
गेल्या तीन वर्षापासून धरमतर येथे जलसमाधी, टाळा बंद अशी आंदोलने केली आहेत. मुख्यमंत्री, पालकमंत्री याच्या सोबत दोन दोन वेळा बैठका झाल्या. मात्र आमच्या मागण्या जैसे थे आहेत. मागण्या मान्य न झाल्यास शुक्रवार पासून सर्व खाजगी प्रवासी वाहतूक बंद ठेवली जाणार आहे. तर १३ हजार कुटुंबाचा विचार शासनाने आणि लोकप्रतिनिधी यांनी केला नाही तर आम्हाला वेगळा विचार करावा लागेल.
विजय पाटील, अध्यक्ष, रायगड जिल्हा विक्रम मिनिडोअर संघटना