उरण : भरतीचे पाणी बुधवारी मध्यरात्री उरण तालुक्यातील फुंडे, नवघर, कुंडेगाव, भेंडखळ गावातील अनेक घरांत शिरले. संपूर्ण कुंडेगाव पाण्यात बुडाल्याने ग्रामस्थांना रात्र घरातील पाणी उपसण्यात आणि थंडीत कुडकुडत काढावी लागली. परिसरातील नैसर्गिक नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात भराव करण्यात आला आहे. सिडको, महसूल विभागाचे याकडे दुर्लक्ष होत आहे. भरावाच्या पाण्याचा निचराच होत नसल्याची तक्रार सेनेचे राजिप सदस्य विजय भोईर यांनी केली आहे.
उरण तालुक्यातील सिडकोच्या हद्दीत असलेल्या अनेक गावांच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात दगड-मातीचा भराव केला जात आहे. या भरावामुळे नैसर्गिक नाले बुजले गेले आहेत. घराच्या जोत्यापेक्षाही अधिक उंचीच्या भरावामुळे रस्ते आणि घरांची उंची भरावापेक्षाही कमी झाली आहे. परिणामी, समुद्राचे पाणी गावात शिरू लागल्याच्या घटना वारंवार घडू लागल्या आहेत. बुधवारी मध्यरात्री गावकरी झोपेत असतानाच समुद्राच्या भरतीचे पाणी थेट तालुक्यातील फुंडे, नवघर, कुंडेगाव, भेंडखळ गावातील अनेक घरांत शिरले. सिडकोने मातीचा भराव करताना पाण्याचा निचरा करणारे नैसर्गिक नालेच बुजवले आहेत.
उरण तहसीलदारांनी समुद्राचे पाणी शिरलेल्या गावांची आणि आर्थिक नुकसान झालेल्या घरांची पाहणी करून पंचनामे तयार करण्याच्या कामाला सुरु वात केली आहे. पंचनामे पूर्ण झाल्यानंतरच नेमका आर्थिक नुकसानीचा आकडा सांगता येईल, अशी माहिती उरण तहसील कार्यालयातून देण्यात आली. गुरुवारी सायंकाळपर्यंत एकही शासकीय अधिकारी चौकशीसाठी गावाकडे फिरकलाच नसल्याची संतप्त प्रतिक्रि या राजिप सदस्य विजय भोईर यांनी व्यक्त केली आहे.