निखिल म्हात्रे - रायगड/अलिबाग : जिल्ह्यात काेराेना विषाणू फाेफावत असताना नागरिकांना त्याचे देणेघेणे नसल्याचे दिसत आहे. संचारबंदीत खरेदीसाठी सूट दिलेली आहे. मात्र, १०० रुपयांच्या भाजीपाल्यासाठी नागरिक स्वतःसह समाजाचे आराेग्य धाेक्यात टाकत आहेत. जिल्ह्यात दिवसाला सरासरी १४ रुग्ण सरणावर जात आहेत. असे असतानाही सरकार आणि प्रशासनाचे नियम दरराेज सकाळी सर्वच बाजारपेठांमध्ये पायदळी तुडवले जात आहेत. पाेलीस कारवाई करत आहेत. मात्र, त्यालाही ते जुमानत नाहीत. त्यामुळे गेल्या वर्षी पहिल्या लाटेत पाेलिसांनी कारवाईचा उगारलेला दंडुकाच बरा हाेता, असे म्हणण्याची वेळ आली आहे.
अलिबाग - दिवसेंदिवस कोरोना रुग्णांत वाढ होत असून, सध्या तालुक्यात कोरोना रुग्णसंख्येचा विस्फोट झाला आहे. अलिबाग तालुक्यात दिवसाला ७३ ते ९० त्या घरात पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद होताना दिसत आहे. या परिस्थितीला नागरिकांचा अति उत्साहीपणा घातक ठरत आहे. या ना त्या कारणाने नागरिक सतत बाहेर फिरत असल्याने कोरोनाची साखळी तोडणे अशक्य झाले आहे. तालुक्यात सक्रिय रुग्णांची संख्या ३ हजार ३८७ वर पोहोचली आहे. या रुग्णांवर सद्यस्थितीत येथील जिल्हा रुग्णालयात तर काहींवर होम आयसोलेशनमध्ये उपचार सुरू आहेत.
अलिबाग तालुक्यात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या ११ हजार २०५ वर पोहोचली आहे. एकूण बाधित रुग्णांपैकी २८३ रुग्णांचा मृत्यू झाला असून, ७ हजार ५३५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तालुक्यात दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे अलिबागकर चिंतित असून, नव्याने कोरोनाचे ७३ रुग्ण वाढले आहेत. यामध्ये सासवणे ०२, अलिबाग शहर ०२, नागाव ०१, पिंपलभाट ०३, धोकोवडे ०३, मांडवा ०३, मानी ०२, चैल ०२, पेझारी ०२ असे अलिबाग तालुक्यात विविध ठिकाणी एकूण ७३ रुग्णांची आज नोंद झाली आहे, तर ११४ जण उपचारानंतर घरी सुखरूप परतले आहेत.
अनेकजण शासकीय नियम पायदळी तुडवित आहेत. रोज सकाळी ८ ते ११ या वेळेत किराणा व भाजीपाला घेण्यासाठी प्रचंड गर्दी करत आहेत. आपल्याला पुन्हा कधीच भाजी-किराणा मिळणार नाही, अशा पद्धतीने नागरिक कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्यासाठी हातभार लावीत आहेत.
जिल्हा प्रशासनाकडून सूचना देऊन, दंड करून, कारवाई करूनही जनता प्रशासनाला सहकार्य करायला तयार नाही. जनतेला शिस्त लावण्याच्या प्रयत्नात अधिकारी-कर्मचारी थकून गेले आहेत. अशा चुकांमुळेच अलिबाग तालुक्याचा आकडा वाढत चालला आहे.सर्व विभागांचे अधिकारी-कर्मचारी रात्रंदिवस सेवा करत आहेत. वैद्यकीय सेवा देणारेच आजारी पडताहेत. नगरपरिषदेचे कर्मचारी तरी किती अंत्यविधी करणार, कोरोना योद्धेच काम करताहेत. काही नागरिकांच्या गलथानपणामुळे सर्व व्यवस्थाच कोलमडून पडू शकते.
आरोग्याच्या दृष्टीने नागरिकांनी आवश्यक ती सर्व खबरदारी घ्यावी. गर्दीत जाणे टाळावे, गर्दी होईल अशा कार्यक्रम-समारंभांचे आयोजन करू नये आणि अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे. कोणाला लक्षणे जाणवत असल्यास त्वरित तपासणी करून घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून सातत्याने होत आहे.