उरण : उरण तालुक्यात धुतूम ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आयओटीएल कंपनीमध्ये व्ही. बी. इंजिनीअरिंग या खासगी ठेकेदारीमध्ये काम करणाऱ्या कामगारांनी मागील १५ दिवसांपासून वेतनवाढीची मागणी मान्य न झाल्याने बुधवारपासून काम बंद आंदोलन केले. काम बंदमुळे कंपनीच्या कामकाजावर मात्र विपरीत परिणाम झाला आहे.उरण तालुक्यातील धुतूम ग्रामपंचायत हद्दीत असलेल्या आयओटीएल ही रासायनिक कंपनी कार्यरत आहे. कंपनीत चालणाºया विविध कामांची कंत्राट व्ही. बी. इंजिनीअरिंग या ठेकेदार कंपनीला देण्यात आली आहेत. साधारणत: ३५ स्थानिक कामगार विविध विभागांत १८ वर्षांपासून काम करीत असले तरी आवश्यक सोयी-सुविधांपासून वंचित आहेत. त्यांना वेळेत वेतन मिळत नाही. कामगारांच्या पीएफच्या रकमाही वेळेत खात्यावर जमा केल्या जात नसल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. त्यामुळे ठेकेदार बदलण्याची मागणी कामगारांकडून होऊ लागली आहे. अशा या ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे कामगारांमध्ये असंतोष आहे. व्ही. बी. इंजिनीअरिंग कंपनीचे व्यवस्थापन आणि कामगार संघटना यांच्यामध्ये वेतनीवाढीसंदर्भात दोन ते तीन वेळा बैठकाही झाल्या. मात्र, योग्य तोडगा न निघाल्याने कामगारांमध्ये असंतोषाचा भडका उडाला आहे.व्यवस्थापनाच्या आडमुठ्या धोरणामुळे कामगार संतप्त झाले असून, बुधवारपासून व्ही. बी. इंजिनीअरिंग या ठेकेदारी कंपनीविरोधात काम बंदचे हत्यार उपसल्याची माहिती कामगार संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र घरत यांनी दिली. कामगारांना वार्षिक सहा हजारांपर्यंत वेतनवाढीची तयारी व्यवस्थापनाने दर्शविली आहे. मात्र, ही तुटपुंजी वेतनवाढ कामगारांना मान्य नाही. वेळीच कामगारांच्या मागण्यांची पूर्तता न केल्यास यापुढे कुटुंबीयांसह उपोषणाला बसावे लागेल, असा इशाराही घरत यांनी व्यवस्थापनाला या वेळी दिला.वेतनवाढ आणि इतर मागण्यांबाबत कामगार संघटना, व्यवस्थापन यांच्यात चर्चा सुरू आहेत. यामध्ये निश्चित तोडगा निघेल, असा विश्वास कंपनीचे मालक विलास ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
आयओटीएलमधील कामगारांचे काम बंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 1:11 AM